
नुकसानग्रस्तांना प्रशासनाने त्वरित भरपाई द्यावी या मागणीसाठी दापोलीचे आमदार संजय कदम यांचा उद्या मोर्चा
दापोलीः- वादळी पावसामुळे झालेले शेतकर्यांचे नुकसान व क्यार वादळामुळे मच्छीमारांच्या वाहून गेलेल्या डिंग्या याबाबत प्रशासनाने त्वरीत भरपाई द्यावी यासाठी दापोलीचे आ.संजयराव कदम यांच्या नेतृत्वाखाली दापोली राष्ट्रवादीतर्फे मोर्चा काढण्यात येणार आहे.याबाबत दापोलीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आ.संजयराव कदम म्हणाले की, वादळी पावसामुळे शेतकर्यांचे गावागावामध्य मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. आंबा, काजू, भात, सुपारी ही पिके हातातून गेली असल्याने दापोली तालुक्यातील जनतेला उपासमारीची वेळ आली आहे. कोकणातील शेतकरी जरी आत्महत्या करत नसला तरी सरकारने या शेतकर्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करणे गरजेचे आहे. या सर्व परिस्थितीवर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने दिनांक ६ नोव्हेंबर रोजी मोर्चा काढण्यात येणार असून हा मोर्चा केळसकर नाका येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकातून सुरु होऊन एस.टी. स्टॅण्ड, मच्छीमार्केट, बाजारपेठ मार्गे तहसिल कार्यालयावर धडकेल व तहसिलदारांना निवेदन देऊन मोर्चाची सांगता केली जाईल. या मोर्चामध्ये शेतकरी आपल्या बैलगाडयांसह तसेच मच्छीमार आपल्या होडयांसह सहभागी होणार आहेत. जर शासनाने या परिस्थितीकडे त्वरीत गांभिर्याने लक्ष दिले नाही तर पुढील १५ दिवसात जेलभरो आंदोलन करण्यात येईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
या पत्रकार परिषदेला नगरसेवक श्री.सचिन जाधव, तालुका सरचिटणीस श्री.रविंद्र कालेकर व अन्य मान्यवर उपस्थित होते.
www.konkantoday.com