
मुख्यमंत्र्यांनी घातले श्री देव भैरी बुवाला साकडे
रत्नागिरी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रीदेव भैरीचरणी पुष्पहार अर्पण केला आणि रत्नागिरीकरांसह समस्त महाराष्ट्रातील जनतेला सुख, समृद्धी व भरभराट देवो, असे साकडे घातले. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी श्री देव भैरी मंदिरात भेट देण्याची ही पहिलीच वेळ होती. यावेळी बारावाड्यातील मानकरी मंदिरात उपस्थित होते. मुख्यमंत्री ना. शिंदे यांनी श्रीदेव भैरीमंदिर फिरुन श्री तृणबिंदुकेश्वर व सर्व देवतांचे दर्शन यावेळी घेतले. बारावाड्यांचे मानकरी यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. श्रीदेव भैरी देवस्थानचे अध्यक्ष रवींद्र तथा मुन्ना सुर्वे यांनी मुख्यमंत्र्यांना मंदिरातील पंचायतनाची माहिती दिली. बारा वाड्यातील सर्व मानकर्यांनी मिळून मुख्यमंत्र्यांचा शाल, श्रीफळ, फेटा बांधून व श्रीफळावर कोरण्यात आलेली गणेशाची प्रतिमा भेट देण्यात आली. श्रीदेव भैरीची प्रतिमा भेट देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. देवस्थान समितीच्यावतीने ना. मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. यामध्ये देवस्थानचा समावेश क वर्ग पर्यटनस्थळात करण्याची आणि परिसर सुशोभिकरणासाठी निधी देण्याची मागणी करण्यात आली. यावेळी देवस्थानचे राजन जोशी, विजय खेडेकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.