रत्नागिरी-सिंधुदूर्ग जिल्ह्यातील 292 आस्थापनांना अचानक भेटी**229 जणांवर खटले ; 10 लाख 12 हजार 300 दंड वसुली**वैध मापन शास्त्र प्र. उपनियंत्रक राम राठोड यांची माहिती*
*रत्नागिरी, दि. 13 (जिमाका) : येथील उपनियंत्रक वैधमापन शास्त्र कार्यालयामार्फत रत्नागिरी व सिंधुदूर्ग जिल्ह्यात एप्रिल 2023 ते जानेवारी 2024 या कालावधीत 292 आस्थापनास अचानक भेटी देण्यात आल्या. यात 229 खटले नोंद करण्यात आले असून, 10 लाख 12 हजार 300 एवढ्या दंडाची वसुली करण्यात आली आहे. तसेच वजने व मापन तोलन उपकरणे यांची पडताळणी व मुद्रांक शुल्क 1 कोटी 29 लाख 36 हजार 899 इतकी रक्कम शासनास जमा करण्यात आली आहे, अशी माहिती वैध मापन शास्त्र प्र. उपनियंत्रक राम राठोड यांनी दिली.* महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग अंतर्गत वैध मापन शास्त्र यंत्रणा कार्यरत आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याकरिता उप नियंत्रक, वैध मापन शास्त्र, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी जिल्हास्तरीय कार्यालय जिल्हाधिकारी आवार रत्नागिरी येथे आहे. रत्नागिरी जिल्ह्याकरिता तालुकास्तरीय निरीक्षक, वैध मापन शास्त्र कार्यालय हे रत्नागिरी, राजापूर, संगमेश्वर, चिपळूण व दापोली येथे कार्यरत आहेत. तसेच सिंधुदूर्ग जिल्ह्याकरिता मालवण, कणकवली व सांवतवाडी ही तीन कार्यालय आहेत. वैध मापन शास्त्र यंत्रणेकडून वैध मापन शास्त्र कार्यालय अंतर्गत वजने व मापे यांची पडताळणी करणे, वजने मापे यांची तपासणी करणे व वजने मापे कायद्यांतर्गत वजनात व मापात फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांविरुध्द कारवाई केली जाते. याचबरोबर पॅक बंद वस्तूवरील उद्घोषणा तपासणी, छापील किंमतीपेक्षा जास्त किंमत आकारणाऱ्या दुकानदारांविरुद्ध कारवाई करणे, तसेच या कायद्यांतर्गत नोंदविलेले खटले न्यायालयात दाखल करणे अपराध्यांविरुध्द न्यायालयीन प्रकिया पार पाडून, अपराध्यांस शिक्षा होईल अशी कारवाई करणे. असे कामकाज केले जाते. रत्नागिरी व सिंधुदूर्ग जिल्ह्यातील माहे एप्रिल 2023 ते जानेवारी 2024 या कालावधीत वैध मापन शास्त्र, अधिनियम / नियमानुसार एकूण २९२ आस्थापनांस अचानक भेटी देण्यात आल्या. यामध्ये एकूण २२९ एवढे खटले नोंद करण्यात आले. नोंदवण्यात आलेल्या खटल्यांपैकी १६२ खटले प्रशमन करण्यात आले आहे. या पोटी शासनास रु. १० लाख १२ हजार ३०० एवढे प्रशमन दंड व्यापाऱ्यांकडून वसुली करुन शासन जमा करण्यात आला आहे. तसेच वजने व मापन तोलन उपकरणे यांच्या पडताळणी व मुद्रांकन शुल्क १ कोटी २९ लाख ३६ हजार ८९९ एवढी रक्कम शासनास जमा करण्यात आली आहे. वैध मापन शास्त्र यंत्रणेकडून नियमित, अचानकपणे व ग्राहक तक्रारीच्या अनुषंगाने आस्थापनेस भेटी देउन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या व्यापाऱ्यांविरुध्द जिल्ह्यात व्यापकपणे कारवाई करण्यात येत आहे. आठवडे बाजार, दैनंदिन बाजार पेठा, भाजी मार्केट, मच्छी मार्केट व इतर बाजारपेठेंमधील दुकानांना भेटी देऊन कारवाई करण्यात येत आहे. व्यापाऱ्यांकडून वजने व मापे यांची फसवणूक होत असल्यास, वैध मापन शास्त्र यंत्रणेकडे कृपया तक्रारकरावी. आपल्या तक्रारीवर सात दिवसांच्या आत संबंधित व्यापाऱ्यांविरुध्द तक्रारीनुसार कारवाई करुन ग्राहकास/नागरिकांस केलेल्या कारवाई बाबत कळविण्यात येईल. ग्राहक तक्रारी करिता संपर्क क्रमांक ०२३५२२२०८५५, कोकण भवन ०२२२७५७४०७४ टोल फ्री क्रमांक 1800114000/1915, ई मेल aclmratnagiri@yahoo.in/dyclmms@yahoo.in/dyclmmscomplaint@yahoo.com