
*पालकमंत्री उदय सामंत यांनी मध्यस्थी केल्याने जयगड येथील मच्छीमारांचे उपोषण मागे*
__पालकमंत्री उदय सामंत यांनी जेएसडब्ल्यू पोर्टच्या अधिकार्यांशी चर्चा केल्यानंतर कंपनीने जयगड मच्छीमारांच्या तीन प्रश्नांबाबत सकारात्मक पत्र दिल्याने आमरण उपोषण स्थगित करण्याचा निर्णय मच्छीमारांनी घेतला आहे. उर्वरीत प्रश्नांसाठी आंदोलने करण्यात येईल, असा इशाराही यावेळी मच्छीमारांनी दिलागेले तीन दिवस जयगड मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थेच्या सदस्यांनी जेएसडब्ल्यू पोर्टच्या समोर आमरण उपोषण सुरु केले होते. प्रशासन व जेएसडब्ल्यू पोर्ट कंपनीने याकडे दुर्लक्षच केले होते. परंतु राज्याचे उद्योगमंत्री व जिल्हयाचे पालकमंत्री उदय सामंत यांनी फोनवर कंपनीच्या वरिष्ठांशी चर्चा केली. त्यानंतर कंपनी प्रशासनाने आमरण उपोषणाला बसलेल्या जयगड मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थेच्या पदाधिकार्यांना लेखी स्वरुपात पत्र दिले.यामध्ये जेएसडब्ल्यू कंपनीने मच्छीमारांना बर्फ कारखाना चालवण्यासाठी दिला होता. परंतु ऑपरेटर नसने हा कारखान बंद असून, त्यानंतर सोसायटीने अटी व शर्थी मान्य असलेला ऑपरेटर दिल्यानंतर बर्फ कारखाना चालू करण्याकरीता तांत्रिक सर्वेक्षण केले जाईल व अंदाजपत्रक तीन महिन्यात करुन तो चालू करण्यात येईल. बर्फ कारखाना कमीतकमी पाच वर्ष चालवण्याची हमी ऑपरेटरने कंपनीला द्यावी असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे खाडीमुखाशी असणारा गाळ काढण्यासाठी ड्रेजिंग करणे आवश्यक असून सोसायटी मेंबरना सोबत घेऊन सर्व्हे केला जाईल व पावसाळ्यानंतर ड्रेजिंग करण्याचे आश्वासन दिले आहे. मच्छीमारांसाठी जेटी बांधण्याकरीता शासनाकडून आवश्यक परवानग्या मिळाल्यानंतर कंपनी शासनास आवश्यक ते सहकार्य करेल असे पत्र लिखित स्वरुपात दिले आहे. पोलीस अधिकारी व कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्यांनी आमरण उपोषणकर्त्या मच्छीमारांना हे पत्र दिल्यानंतर मच्छीमारांनी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान कंपनी कशा पध्दतीने स्वत: दिलेली आश्वासनांची पूर्तता करते हे पाहून पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्याचा मानस मच्छीमारांनी व्यक्त केला आश्वासनानंतर आंदोलनकर्त्यांनी आपले उपोषण स्थगित केले.www.konkantoday.com