
चिपळूण शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर नियंत्रण आणण्यासाठी नगर पालिका प्रशासनाने मोठे पाऊल उचलले
चिपळूण शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर नियंत्रण आणण्यासाठी नगर पालिका प्रशासनाने मोठे पाऊल उचलले आहे. तब्बल ४८ व्यापारी संकुले व इमारतींना पार्किंगसंदर्भात गंभीर उल्लंघन केल्याबद्दल नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.येत्या सात दिवसांत आवश्यक सुधारणा न झाल्यास थेट दंडात्मक कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा नगरपालिकेने दिला आहे.
शहरातील अनेक व्यापारी संकुले व खासगी इमारतींनी बांधकाम परवान्याच्या अटींनुसार पार्किंगची सोय न करता ती जागा व्यापारी उपयोगासाठी वळवली आहे. परिणामी रस्त्यावर वाहनांचा ताण वाढत असून वाहतूक कोंडी अधिकच गंभीर होत आहे. विशेषत: सकाळ-संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेत शहरातील प्रमुख रस्त्यांवर गोंधळ निर्माण होत आहे. आगामी गणेशोत्सव काळात शहरात भाविकांची मोठी गर्दी येणार असल्याने वाहतुकीचा प्रश्न अधिकच गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच नगर पालिका प्रशासनाने वेळीच कठोर भूमिका घेत पार्किंग व्यवस्थेतील त्रुटींवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. पाठवलेल्या नोटिसांमध्ये संबंधित व्यापारी संकुले व इमारतींच्या मालकांना सात दिवसांत योग्य पार्किंगची सोय उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या कालावधीत सुधारणा न झाल्यास जागा सील करणे, दंड आकारणे अशा कठोर कारवाया केल्या जातील, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.




