रत्नगिरीची शानतरुणाईची जानअनिकेत तुझ्या यशाचीचढती राहो कमान!!
प्रिय अनिकेत,
तसं पाहिलं तर महाविद्यालयात असल्यापासूनच तुझ्याशी ओळख होती. गोगटे जोगळेकर महाविद्यालयात जीएस म्हणून तू पहिल्यांदा समोर आलास. पण खऱ्या अर्थाने तुझ्याशी परिचय झाला तो माजी आमदार बाळासाहेब माने यांचा स्वीय सहाय्यक म्हणून. तसेच आमदार प्रसाद लाड, निरंजन डावखरे यांचाही स्वीय सहाय्यक म्हणून तू काम पाहीलंस. त्यावेळी संपर्कात आलेली माणसं आपल्या स्वभावामुळे टिकवून ठेवण्याचं काम तू खूप चांगलं केलंस. दादा, ताई, वहिनी, साहेब असं म्हणत ती माणसं तू जोडून ठेवलीसच, पण त्यापेक्षा आणखी माणसं तुझ्याशी जुळत गेली. कितीही कठीण प्रसंग असले तरी तुझं वागणं, बोलणं आणि वावरणं खूप सहज होतं. त्यामुळे कठीण प्रसंगातही माणसं तुटली नाहीत. तू जिथे आहेस त्या पदावर कायम राहणार नाहीस, तू आणखी मोठी झेप घेशील, याचा अंदाज आधीपासूनच होता. याचं कारण म्हणजे तुझी धडपडी वृत्ती. कामाचा कितीही ताण तू सहज झेपवू शकतोस, आपलं ध्येय गाठण्यासाठी पुरेसा वेळही देऊ शकतोस याची कल्पना तेव्हाच आली होती आणि आता त्याची प्रचिती क्षणोक्षणी येते. आपले नेते, बांधकाम मंत्री माननीय रवींद्र चव्हाण साहेबांनी हिरा पारखून घेतला आहे. आता चव्हाण साहेबांचा स्वीय सहाय्यक म्हणून काम करताना अख्ख्या राज्यातून त्यांना भेटायला येणारे लोक तू हाताळतोस तरीही रत्नागिरीशी असलेली नाळ तू चांगली जपली आहेस. आपल्यावर साहेबांनी डोळे झाकून विश्वास ठेवावा, ही तुझी सर्वात मोठी कमाई आहे. ही कमाई अनेकांना अख्खं आयुष्य घालवूनही मिळत नाही. पण तू मात्र ती कमी वयातच मिळवलीस, याबद्दल तुझा मित्र म्हणून मला खूप अभिमान वाटतो. रत्नागिरीचा अनिकेत हा तरुण रवींद्र चव्हाण साहेबांचा स्वीय सहाय्यक म्हणून महाराष्ट्रभर त्यांच्यासोबत सावलीसारखा फिरतो…. राजकारणात हा विश्वास सहजासहजी मिळवता येत नाही. मात्र माणसं पारखण्याची चव्हाण साहेबांची पद्धत आणि झोकून देऊन काम करण्याची तुझी वृत्ती यामुळे आज तू खूप मोठ्या पदापर्यंत पोहोचला आहेस, याचा खरंच आम्हा सर्वांना अभिमान वाटतो.
अनिकेत आता मोठा झाला, तो फोन उचलत नाही, अशी प्रेमळ तक्रार अनेक जण करतात. मलाही कधीतरी तो अनुभव येतो. पण मलाही खात्री असते की तो कामातच असेल आणि जेव्हा मोकळा होईल तेव्हा आवर्जून फोन करेल आणि माझी निराशा होत नाही. तुझ्या कामाचा व्याप, तुझी कामाची वेळ मी जवळून पाहिली आहे आणि खरंच तुझ्या या प्रगतीचा यशस्वी होण्याचा सार्थ अभिमान आहे.
यशाची शिखरे चढ मात्र तब्येतीला जप. तुझा कामाचा वाढता व्याप, अवाका , तुझी तल्लख बुद्धिमत्ता यामुळे तू रत्नागिरीचे नाव राजकीय क्षेत्रात खूप उंचीवर नेशील याची खात्री आहे.
रत्नगिरीची शान
तरुणाईची जान
अनिकेत तुझ्या यशाची
चढती राहो कमान!!
पूर्ण होवोत तुझ्या सर्व इच्छा
अनिकेत, तुला वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!!
उमेश किशोर कुळकर्णी
अध्यक्ष
श्री रत्नेश्वर ग्रंथालय धामणसें