*भाट्ये समुद्रकिनाऱ्यावर पार्किंग, रस्ता, चेंजिंग रूम, वॉशरूमसह अनेक कामे वेगाने सुरू*
*
रत्नागिरी शहर परिसरात पर्यटनदृष्ट्या विकासात्मक उपक्रम राबवले जात असतानाच शहरानजीकच्या व ग्रामीण भागातील पर्यटनाला चालना मिळावी यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांनी अनेक ठिकाणी पर्यटनांच्या कामांवर भर दिला आहे.शहरालगतच्या भाट्ये समुद्रकिनाऱ्यावर पार्किंग, रस्ता, चेंजिंग रूम, वॉशरूमसह अनेक कामे वेगाने सुरू आहेत.रत्नागिरी शहरालगतच्या भाट्ये गावाला ऐतिहासिक महत्व आहे. छत्रपती शिवरायांच्या आरमारातील प्रमुख सेनानी मायाजी भाटकर यांचे गाव असून, त्यांची समाधीही या गावात आहे. भाट्ये खाडी व समुद्रकिनार्याच्या मधोमध असणऱ्या या गावातील सुंदर समुद्रकिनाऱ्याकडे पर्यटकही मोठ्या प्रमाणात आकर्षित होत असतात. सुमारे दीड किलोमीटरहून अधिक लांबीचा समुद्रकिनारा या गावाला लाभलेला असून, सुरूबनामुळे या किनाऱ्याचे सौंदर्य वाढले आहे. रत्नागिरीकरांसह पर्यटकही मोठ्या प्रमाणात किनार्यावर येत असल्याने पालकमंत्री उदय सामंत यांनी अनेक उपक्रम या किनाऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी राबवले आहेत. भाट्ये किनाऱ्यासाठी तब्बल ७८ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या ठिकाणी चारचाकींसह दुचाकी पार्किंगची व्यवस्था केली जात असून, पर्यटकांसाठी शौचालय, वॉशरूम, समुद्रस्नानंतर कपडे बदलण्यासाठी चेंजिंग रूम उभारल्या जात आहेत. त्याचप्रमाणे किनार्यावर एका बाजूने प्रवेश केल्यानंतर दुसर्या बाजूने मुख्य रस्त्यावर बाहेर पडण्यासाठी रस्ताही बनवला जात आहे. भाट्ये गावचे माजी सरपंच पराग भाटकर यांच्यासह सहकारी या कामावर लक्ष ठेवून असून, ते काम चांगल्या पद्धतीने कसे होईल याबाबत ठेकेदारांना सूचना करत आहेत. सुरूबनामध्ये भाट्ये गावची स्मशानभूमी असून, ग्रामपंचायत फंडामधून या स्मशानभूमीभोवती संरक्षक भिंत उभारण्यात आली आहे.www.konkantoday.com