*चिपळुणात कर्जासाठी ठेवलेले दागिने केले गायब*_______
चिपळूण—— गरीबांसाठी माऊली बनलेल्या शहरातील एका घाडगे नामक सावकाराने कर्जापोटी महिलेचे दागिने गायब केल्याचा प्रकार पुढे येत आहे. याचा खडपोली येथील एका महिलेने पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला आहे. त्यामुळे पोलीस आता काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.याबाबत प्रिती दयानंद मोहिते यांनी दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे की, माझ्या घरगुती कामासाठी जावेचे दागिने चिपळूण नागरी संस्थेत ठेवले होते. त्याचा लिलाव होवू नये म्हणून मला १ लाख रुपयांची गरज होती. ही रक्कम मी ८ सप्टेंबर २०२३ रोजी घाडगे या सावकाराकडून घेतली. त्यावेळी मला ५ टक्के व्याज लागेल असे सांगण्यात आले होते. संस्थेतून दागिने सोडवून घेतल्यानंतर मी घाडगे यांच्या कार्यालयात गेले असता मला दागिने त्यांच्याकडे ठेवण्याचा तगादा लावण्यात आला. त्यानुसार दागिने व संस्थेने दिलेली पावती त्यांनीच त्यांच्याकडे घेतली व लगेचच फाडून टाकली.त्यानंतर मी हप्ते भरण्यास सुरूवात केली असता येथील कॅशियर असलेल्या अक्षया नावाच्या मुलीने माझ्याकडे २० टक्के दराने व्याज मागितले. तिला मी ५ टक्के दर सांगितल्याचे बोलले असता मला सरांनी २० टक्केने पैसे घेण्यास सांगितल्याचे तिने सांगितले. त्यामुळे घाडगे व त्यांचे कर्मचारी आपली पिळवणूक करीत असल्याचे माझ्या लक्षात आल्याने मी काही सामाजिक कार्यकर्त्यांची मदत घेण्याचे ठरविले. त्यानुसार १ फेब्रुवारी रोजी सायंकाळी नयनेश दळी व त्यांच्या मित्रांसोबत घाडगे यांच्या कार्यालयात गेले. तेथे मी माझे दागिने द्या, मी पैसे देते, असे सांगत होते. मात्र ते ऐकायला तयार नव्हते. त्यामुळे आम्ही कार्यालयातून बाहेर आलो. त्यानंतर घाडगे यांनी आमच्याविरोधात खोटी तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीनुसार आमच्यावर कारवाई करा, मात्र त्यांनी तक्रारीत नमूद केलेले प्रकार घडले की नाहीत, याची त्यांच्या कार्यालयातील सीसीटीव्ही तपासून खात्री करा, अशी मागणी मोहिते यांनी केली आहे. www.konkantoday.com