
*गुहागरच्या महावितरण सेवेत आधुनिक हिरकणी*______
*रत्नागिरी*— आज प्रत्येक क्षेत्रात महिला आपले कर्तव्य गाजवताना दिसतात. पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून त्या विविध क्षेत्रात सेवा बजावताना आपण पाहतो. आता वीज महामंडळातही महिलांना वीज सहाय्यक म्हणून काम करण्याची संधी प्राप्त झाली आहे. गुहागर महावितरण कार्यालयात सहाय्यक म्हणून सेवा बजावणार्या नेहा भरत राठोड यापैकीच होत. त्या गुहागर तालुक्याच्या महावितरण विभागात आधुनिक हिरणी म्हणून ओळखल्या जात आहेत.राज्याच्या वीज मंडळात सेवा बजावणे तेवढे सोपे काम नाही. वीजेबाबतच्या समस्या, अडचणी, अवघड श्रमाची कामे होत असल्याने येेथे सहाय्यक म्हणून पुरूष वायरमनचीच मक्तेदारी होती. वीज खांबावर चढणे, वाहिन्या ओढणे, अडथळा ठरणारी झाडी तोडणी अशी अवघड कामे आज गावागावांमध्ये वायरमन कर्मचारी करताना दिसतात. वीज मंडळात महिला अधिकारीही आहेत. मात्र फिल्डवर काम करणार्या महिला आजपर्यंत नव्हत्या.ही कसर महिलांनी भरून काढली आहे. अशा महिलांना वीज खांबावर चढण्याचेही प्रशिक्षण देण्यात आले होते. मूळ यवतमाळ जिल्ह्यातील (पूसद) येथील असणार्या नेहा राठोड या २०२२ मध्ये महावितरण सेवेत रूजू झाल्या व प्रथम महिला कर्मचारी म्हणून गुहागर महावितरण विभागात सेवेत आल्या. वीजबिल वसुलीत त्या अग्रेसर आहेत. तसेच वीज खांबावरील दुरूस्तीसाठी वीजखांबावर चढण्यातही त्या पटाईत आहेत. आता त्यांच्यावर संबंधित विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. www.konkantoday.com