
अलोरेत विद्यार्थीनी-महिलांसाठी नि:शुल्क ‘योगासन व सूर्यनमस्कार’ कार्यशाळा
अलोरे, चिपळूण :: येथील मोरेश्वर आत्माराम आगवेकर विद्यालय आणि सीए. वसंतराव लाड कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्ष कार्यक्रमाचा भाग म्हणून येत्या मंगळवारी (दि. २१) जागतिक योगदिनी, प्रशालेच्या १९९२ बॅचच्या माजी विद्यार्थीनी राहिलेल्या सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या योगशिक्षिका गीतांजली दिवेकर-टिळक ‘योगासन व सूर्यनमस्कार’ कार्यशाळेस मार्गदर्शन करणार आहेत. हा कार्यक्रम सकाळी साडेसात ते दहा या वेळेत अलोरे येथील करमणूक केंद्रात होईल.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने जगभर २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो. कोरोनासारख्या महामारीशी लढताना मानसिक आणि शारीरिक बळ योगशास्त्रानेच संपूर्ण विश्वाला दिले होते. योगशास्त्र हे मानवसृष्टी इतके प्राचीन मानले जाते. भारतीय योगविज्ञान ही संपूर्ण विश्वासाठी अमृतमय देणगी आहे. पूर्वी योग ही अवघड साधना आहे असं वाटायचं मात्र योग हा सर्वांनीच करण्याचा विषय असल्याचे सिद्ध झाले आहे. योग ही एक जीवनशैली आहे. मनुष्याच्या आहार विहार आणि आचरणात त्याचा समावेश व्हायला हवा. विद्यार्थी, बैठे काम करणाऱ्या व्यक्ती, महिला अशा सर्वस्तरातील व्यक्तींसाठी योगासने हा व्यायाम प्रकार म्हणजे प्राचीन भारतीय संस्कृतीने मनुष्याला दिलेली देणगी आहे. पाश्चात्य देशातील लोकांनी याचे महत्व ओळखून त्याचा स्वीकार केला आहे. गीतांजली दिवेकर-टिळक ह्यांचे शिक्षण डिग्री इन कॉम्प्युटर इंजिनिअरींग झाले आहे. त्या योग गुरुकुल केंद्र नाशिकच्या पदवीधारक आहेत. प्राणिक हिलिंग या आधुनिक उपचार पध्दतीचे विशेष प्रशिक्षण त्यांनी घेतले आहे. पुण्यातील रुग्णालयांमध्ये त्या ‘समुपदेशन कार्य’ करतात. पुण्यासह परदेशातील योग साधकांनाही त्या मार्गदर्शन करीत असतात.
अलोरेत शाळेच्या सुवर्णमहोत्सवी वर्ष कार्यक्रमाचा भाग म्हणून संपन्न होणाऱ्या कार्यशाळेत शाळेच्या विद्यार्थीनींसह पंचक्रोशीतील शासकीय, निमशासकीय नोकरदार महिला, शिक्षिका, बचत गटातील सदस्य महिला, गृहिणी, ग्रामपंचायत महिला सरपंच-उपसरपंच सदस्या, महिला लोकप्रतिनिधी आदी सर्व क्षेत्रातील महिलांनी या नि:शुल्क कार्यशाळेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी ९०११६३०४९१, ९०११९७९७३४, ७७६८८३३८८६ येथे संपर्क साधावा असे आवाहन मुख्याध्यापक विभाकर वाचासिद्ध यांनी केले आहे.
