
कशेडी बोगद्यात योग्य उपाययोजना करा, मुख्यमंत्री ना. शिंदेंच्या अधिकार्यांना सूचना
मुंबई-गोवा महामार्गाच्या पाहणीसाठी आलेले राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी महामार्गावरील रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याला जोडणार्या कशेडी बोगद्याच्या दोन्ही लेनची पाहणी केली व अधिकार्यांकडून कामाचा आढावा घेतला. बोगद्यातील गळतीबाबतही मुख्यमंत्र्यांनी माहिती घेत बोगद्यामध्ये एकाच लेनमधून गणेशोत्सवात कोकणात मोठ्या प्रमाणात येणार्या चाकरमान्यांसाठी वाहतूक सुरू राहणार असल्याने योग्य उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या.मुदत संपूनही अद्याप पूर्ण न झालेल्या बोगद्याच्या दुसर्या लेनच्या कामाची देखील पाहणी मुख्यमंत्र्यानी भेट देवून केली. यावेळी हे काम अंतिम टप्प्यात आले असून काही महिन्यातच बोगद्याची दुसरी लेन देखील वाहतुकीस सुरू होईल, असे अधिकार्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे कशेडी बोगद्याला लागलेल्या गळतीबाबत मुख्यमंत्र्यांनी विचारणा केली. यावेळी बोगद्यातील काही ठिकाणी लागलेली गळती थांबविण्यासाठी यश आल्याचे अधिकार्यांनी सांगितले.यावेळी महाडचे आमदार भरत गोगावले, रत्नागिरीचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, खेड तालुकाप्रमुख सचिन धाडवे, महाड-रायगड तसेच खेड तालुक्यातील शिवसेनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास कशेडी बोगद्याच्या ठिकाणी आले. यावेळी त्यांनी थांबून राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाच्या अधिकार्यांशी चर्चा केली. www.konkantoday.com