
सायबर गुन्ह्यांमध्ये १६८ कोटी रुपयांची फसवणूक,24 तास हेल्पलाईन सुरू
नवी मुंबई :- नवी मुंबईत सायबर गुन्ह्यांमध्ये सात महिन्यांत १६८ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सायबर क्राईम पोर्टलवर यासंदर्भात ८०१० तक्रारी नोंदविण्यात आल्या असून, २४९ गुन्ह्यांमध्ये ८० कोटी ४७ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले आहे.देशभरात ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत असून, नवी मुंबईत दररोज एक ते तीन व्यक्तींची फसवणूक होत आहे. यामुळे नवी मुंबईत ऑनलाइन गुन्ह्यांची संख्या वेगाने वाढत असल्याचे दिसून येत आहे.सध्या परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी २४ तासांची सायबर हेल्पलाइन (८८२८११२११२) सुरू केली आहे. या हेल्पलाइनद्वारे, फसवणूक झाल्यास तातडीने कार्यवाही केली जाऊ शकते. त्यामुळे नुकसान कमी होण्यास मदत होईल. पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी या हेल्पलाइनच्या महत्त्वावर प्रकाश टाकला आणि यासोबतच पोलिसांनी व्हॉट्सॲप चॅनेलचा शुभारंभही केला आहे.पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी वाशीतील पोलिसांच्या एका कार्यक्रमात सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या प्रमाणावर चिंता व्यक्त केली. त्यांनी नमूद केले की, चालू वर्षात १३ कोटी ६७ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीला गेला आहे, त्यामुळे ऑनलाइन गुन्हेगारीचे गांभीर्य वाढल्याचे दिसते.सहाय्यक आयुक्त दीपक साकोरे आणि उपायुक्त अमित काळे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या नवीन उपक्रमांचा प्रारंभ करण्यात आला. नागरिकांनी या सुविधांचा लाभ घ्यावा आणि सायबर फसवणुकीपासून सावध राहावे, असा संदेश पोलिसांनी दिला आहे.