*महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यपालांकडे मागणी*
महाराष्ट्रातील बिघडलेल्या कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी आज राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली आणि राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याची शिफारस केंद्र सरकारला करण्याची मागणी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राज्यपालांकडे करण्यात आली. राज्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने राज्यपाल रमेश बैस यांची राजभवनावर भेट घेऊन निवेदन दिले. या शिष्टमंडळात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, कार्याध्यक्ष आरिफ नसीम खान, चंद्रकांत हंडोरे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड, प्रवक्ते अतुल लोंढे आदींचा समावेश होता.शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या घालून निर्घृण हत्या झाली. पुण्यात पत्रकार निखिल वागळे यांच्यावर पोलिसांच्या उपस्थितीत प्राणघातक हल्ला झाला. भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यामध्ये दोन लोकांवर गोळीबार केला. मीरा रोड येथे धार्मिक तणाव, सरकारने बुलडोझर चालवून गरीबांची घरे तोडली. जळगावातील भाजपचे नगरसेवक मोरे यांची गोळीबार करून हत्या करण्यात आली. यवतमाळमध्ये भरदिवसा एका तरुणाची हत्या झाली. राज्यात गुन्हेगारीला राजाश्रय मिळत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी शिफारस करावी अशी मागणी करण्यात आली.www.konkantoday.com