कृषी महाविद्यालय, फणस संशोधन केंद्र प्रस्तावांना लवकर मिळणार मान्यतादोन कम्युनिटी रेडिओ केंद्रांसाठी सिंधूरत्नमधून १ कोटी – पालकमंत्री उदय सामंत


*रत्नागिरी, दि. ११ – कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी चर्चा झाली असून, कृषी महाविद्यालय आणि फणस संशोधन केंद्रांचे प्रस्ताव लवकरच शासनाकडून मान्य करुन दिले जातील, असे कृषीमंत्र्यांनी सांगितल्याची माहिती देतानाच, दोन कम्युनिटी रेडिओ केंद्रांसाठी सिंधुरत्न योजनेमधून डाॕ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठाला १ कोटी दिले जातील, अशी घोषणा पालकमंत्री उदय सामंत यांनी केली.
लांजा तालुक्यातील गवाणे येथे डाॕ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली, भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली पुरस्कृत कृषी विज्ञान केंद्राच्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन आज पालकमंत्री श्री. सामंत यांच्या हस्ते झाले. यावेळी कुलगुरु डाॕ. संजय भावे, संचालक डाॕ प्रमोद सावंत, डाॕ प्रशांत बोडके, डाॕ प्रकाश शिनगारे, नगराध्यक्ष मनोहर बाईत, सरपंच भीमराज कांबळे आदी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले, कृषी विज्ञान केंद्राच्या जमिनीचा उपयोग शेतकऱ्यांसाठी झाला पाहीजे. आधुनिक युगात अत्याधुनिक सुविधा शेतकऱ्यांपर्यंत पोहचविणे हा या केंद्राचा उद्देश आहे. रेशीम उद्योगाबाबत व्यापक बैठक आयोजित करतो. महिला, युवक यांना या उद्योगाच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी विद्यापीठाने प्रयत्न करावेत.
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातूनही प्रत्येक महिलेला रोजगार मिळवून देवू शकतो. कृषी महाविद्यालय आणि फणस संशोधन केंद्रासाठी ५० एकर जागा देण्याची जबाबदारी माझी आहे, असेही पालकमंत्री म्हणाले.
कोकण कृषी विद्यापीठाने नावाप्रमाणे चांगले काम करावे. संशोधनात्मक काम करुन शेतकऱ्यांपर्यंत त्याची माहिती पोहचवावी. त्यांच्या उत्पन्नात वाढ करुन त्यांना कर्जमुक्त बनवावे, असे मार्गदर्शन करावे. कोकण कृषी विद्यापीठ हे शेतकऱ्यांची मातृसंस्था आहे. त्याच मायेने शेतकऱ्यांना लाभ मिळावेत, असेही पालकमंत्री श्री. सामंत शेवटी म्हणाले.
कुलगुरु डॉ. भावे यांनी, आजचा शेतकरी हा अभ्यासू आहे. त्यांनी उत्पादकता वाढवलेली आहे. बांबूवर काम होणे आवश्यक आहे. 10 हेक्टर जागा बांबूसाठी वापरली तर, आयात करायची आवश्यकता भासणार नाही, असे सांगितले.
प्रास्ताविकेत डॉ. सावंत यांनी कोकण कृषी विद्यापीठाचा इतिहास आणि सद्यस्थिती सांगितली. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते विविध उत्पादक शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. शेवटी डॉ. आनंद हणमन्ते यांनी आभार मानले. यावेळी कृषी स्टाॕलला पालकमंत्र्यांनी भेट दिली.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button