*आजच्या शिकलेल्या पिढीने राजकारणाचा ताबा घ्यायला पाहिजे,-**उदय सामंत*
_सध्या राजकारणाचा स्तर खालावत आहे. मिडियामधून राजकीयदृष्ट्या भाषणे, वक्तव्ये केली जात आहेत. हे महाराष्ट्राच्या पुढील पिढीसाठी अयोग्य असून राजकीय नेत्यांच्या वक्तव्याने भावी पिढीवर परिणाम होत असल्याची खंत पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केली.चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हाणे शिक्षण संस्थेच्या वसंतराव भागवत माध्यमिक विद्यालय, कै. सौ. कमलाईत वामन पेठे कनिष्ठ महाविद्यालय व सेमी इंग्रजी माध्यमाची प्राथमिक शाळेतील २०२४ च्या विविध स्पर्धांच्या पारितोषित वितरण कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. शिक्षणाचा दर्जा व भावी पिढीबद्दल बोलताना मंत्री सामंत म्हणाले, अलिकडे राजकारण व नेत्यांची वक्तव्ये पाहता भावी पिढीतील मुलांवर त्याचा परिणाम होत आहे. यशवंतराव चव्हाण, प्रमोद महाजन यांच्यासारख्या नेत्यांनी राजकारण केले. मात्र पुढच्या पिढीला लाज वाटेल असे राजकारण केले नाही. आदर्श वाटेल असेच राजकारण केले. त्यामुळे महाराष्ट्र राजकारणात नावारूपाला आला आहे. आजकाल लोकांच्यादृष्टीने राजकारण व पुढारी हा १०० टक्के बदनाम असतो. मात्र ही बदनामी बाजूला करायची असेल व चांगल्या मार्गाने राजकारण दाखवायचे असेल तर आजच्या शिकलेल्या पिढीने राजकारणाचा ताबा घ्यायला पाहिजे, तरच येेथे मुलांचे झालेले सत्कार सार्थकी लागतील, अशी अपेक्षा सामंत यांनी व्यक्त केली. www.konkantoday.com