खासदार विनायक राऊत साहेब आपण किती प्रकल्पांचे समर्थन केलात त्याची यादी जाहीर प्रसिद्ध करावी-शिवणे खुर्द ग्रामपंचायत सदस्य, पत्रकार सिद्धेश मराठे यांची मागणी


रत्नागिरी प्रतिनिधी:-
खासदार विनायक राऊत साहेब आपण किती प्रकल्पांचे समर्थन केलेत आणि किती प्रकल्प प्रत्यक्ष आपल्या माध्यमातून कोकणात आणि राजापूर तालुक्यात आले याची एक यादी तयार करून जाहीर रित्या प्रसिद्ध करावी अशी विनंती राजापूर तालुक्यातील शिवणे खुर्द ग्रामपंचायत सदस्य, पत्रकार सिद्धेश मराठे यांनी केली आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे राजापूर दौऱ्यावर आले असताना सभा स्थळी खासदार विनायक राऊत यांनी भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर रिफायनरी प्रकल्पाच्या विषयावरून आरोप केले होते. त्यावर पत्रकार सिद्धेश मराठे यांनी संताप व्यक्त केला आहे.

पत्रकार सिद्धेश मराठे म्हणाले की रिफायनरी प्रकल्पामुळे कोकणचा खऱ्या अर्थाने विकास होणार आहे. मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार आहे. या प्रकल्पामुळे सगळ्यांचीच आर्थिक उनत्ती होणार आहे. मात्र काही राजकीय पक्षांचे नेते मंडळी या प्रकल्पाचे समर्थन करत नाहीत. बारसू परिसरात ग्रामस्थांचा या प्रकल्पाला विरोध आहे. मात्र या ग्रामस्थांमध्ये जनजागृती करण्याची आवश्यकता आहे. ते काम न करता त्यांची माथी आणखी भडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. याचे आम्हा सगळ्या रिफायनरी समर्थकांना दुःख आहे.

राज्याचे उद्योग मंत्री ना. उदय सामंत आणि सिंधुरत्न समृद्ध योजनेचे संचालक किरण सामंत रिफायनरी प्रकल्पाच्या संदर्भात खऱ्या अर्थाने जनजागृती करत आहेत. हा प्रकल्प कोकणच्या कशा प्रकारे फायद्याचा आहे ते समजावून सांगत आहेत. जनजागृती हीच आज गरजेची गोष्ट आहे.

खासदार विनायक राऊत साहेब आपण रिफायनरी समर्थकांची बाजू समजून घेणे गरजेचे आहे. बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर अनेक जमीन मालकांनी जमिनीची एन ओ सी दिल्या आहेत. जे ग्रामस्थ या प्रकल्पाला विरोध करत आहेत त्यांच्यामध्ये आपण जनजागृती करावी. रिफायनरी मुळे काय फायदे होणार आहेत ते त्यांना समजावून सांगावे. रिफायनरी प्रकल्प विनाशकारी नसून कोकणचा सर्वांगीण विकास करणारा हा प्रकल्प आहे हे आपण समजावून सांगावे अशी विनंती पत्रकार सिद्धेश मराठे यांनी केली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button