
विधानसभेतही मिळवू गनिमी काव्याने यश बाळ माने; रत्नागिरी तालुका विस्तारित कार्यकारिणीची बैठक
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात भाजपचे खासदार नारायण राणे यांचा विजय हा शुभशकुन आहे.या दिवसापासून राजेश सावंत जिल्हाध्यक्ष झाले तेव्हापासून विजयाची मालिका सुरू झाली आहे. रत्नागिरीत भाजपचाच आमदार विजयी होऊन येत्या दिवाळीत विजयाचे फटाके वाजवायचे आहेत. लोकसभेत गनिमी काव्याने यश मिळवले आहे. त्यामुळे विधानसभेतही यश मिळवणार, असे प्रतिपादन विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळ माने यांनी केले.येथील अंबर हॉल येथे रत्नागिरी तालुक्याच्या विस्तारित कार्यकारिणीच्या बैठकीत ते बोलत होते. जिल्हाध्यक्ष राजेश सावंत म्हणाले, जिल्हा परिषद अध्यक्ष, सभापती, नगराध्यक्ष, सरपंच अशा पदांवर भाजपा कार्यकर्त्याला संधी मिळाली पाहिजे, आपल्या गावात विकासकाम झाले नाही, मग आपलाच माणूस निवडून आला पाहिजे असे वाटले पाहिजे. जिल्ह्यात परिवर्तनाची लाट आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत १४५ पेक्षा जास्त आमदार निवडून येण्यासाठी भाजपचे प्रयत्न चालू आहेत.