
*कुवेतहून आलेली नौका मुंबईजवळ संशयास्पदरित्या फिरताना आढळली; तिघांची चौकशी सुरु*
_मुंबई – कुवेतहून आलेली एक मासेमारी नौका पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. तामिळनाडूस्थित तीन जण या नौकेवर सापडले असून त्यांची चौकशी केली जात आहे. दक्षिण मुंबईतील अतिसंवेदनशील भागांपैकी एक असलेल्या ससून डॉक परिसरात एक संशयास्पद बोट आल्यानंतर घबराट निर्माण झाली होती. अब्दुल्ला शरीफ असे संशयास्पद बोटीचे नाव असून ती कुवेतहून भारतात आली असल्याचे सूत्रांनी सांगितले. या घटनेनंतर, मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.यलो गेट पोलिसांच्या गस्ती नौकेला ससून डॉकजवळ मासेमारी करणारी नौका प्रथम दिसली. त्यानंतर, केलेल्या चौकशीत ही नौका कुवेतहून आल्याचे समोर आले.सध्या ही नौका गेटवे ऑफ इंडिया येथे नेण्यात आली असून तेथे उभी करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. उपायुक्त संजय लाटकर यांनी सांगितलं की, पेट्रोलींगला असलेल्या पोलिसांना कुवेतची एक नौका संशयास्पदरित्या फिरताना आढलली. या नौकेवर तीन व्यक्ती होते. त्यांना आम्ही किनाऱ्यावर आणलं आणि त्यांची चौकशी केली. तिघांनी दावा केलाय की, ते कन्याकुमारीचे असून कुवेतच्या एका कंपनीत काम करतात. दोन वर्षांपासून ते कुवेतमध्ये काम करत आहेत. पण, त्यांना पगार दिला जात नव्हता. तसेच उपाशी ठेवले जात होते. त्यामुळे त्यांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला. तिघांनी दावा केलाय की, मालकाने त्यांचे पासपोर्ट ठेवून घेतले होते. त्यांनी जीपीएसची मदत घेत प्रवासाला सुरुवात केली. तब्बल १० दिवसानंतर ते मुंबईच्या किनाऱ्यापर्यंत पोहोचले आहेत. पोलिसांनी सांगितलं की, नौका आणि तिघांना तपासण्यात आले असून त्यांना कुलाबा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तिघांना हिंदी, मराठी किंवा इंग्रजी येत नसल्याने चौकशीसाठी काहीसा अडथळा येत आहे. www.konkantoday.com