रिफायनरी विरोधाबाबत स्पष्ट भूमिका आघाडीच्या जाहीरनाम्यात घ्यावी*
__राजापूर तालुक्यातील बारसू-सोलगाव परिसरात रिफायनरी व पेट्रोकेमिकल संकुल, नाटे राजवाडी आंबोळगड किनारी रिफायनरी बंदर व क्रूड ऑईल टर्मिनल तसेच राजापूर तालुक्यातील केमिकल झोन होवू नये अशी स्पष्ट भूमिका पक्षीय धोरणात आणि महाविकास आघाडी, इंडिया आघाडीच्या निवडणूक जाहीरनाम्यात घ्यावी अशी मागणी बारसु-सोलगाव पंचक्रोशी रिफायनरी विरोधी संघटनेच्या वतीने माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.कोकण दौर्याच्या निमित्ताने राजापूरात आलेल्या ठाकरे यांची बारसू-सोलगांव पंचक्रोशी रिफायनरी विरोधी संघटनेचे अध्यक्ष अमोल बोळे आणि सहकार्यांनी श्री धूतपापेश्वर मंदिर येथे भेट घेत निवेदन दिले. यामध्ये बारसू-सोलगांव पंचक्रोशीत प्रस्तावित प्रदूषणकारी रिफायनरी व पेट्रोकेमिकल प्रकल्प, नाटे-राजवाडी आंबोळगड किनारी प्रस्तावित होवू शकणारा क्रूड ऑईल टर्मिनल व एकंदर परिसरातील केमिकल झोन याला येथील ९५ टक्के जनतेचा तीव्र विरोध आहे, असे नमूद केले आहे. www.konkantoday.com