*बातमी देणं हे पत्रकाराचं कर्तव्य – कोर्ट**माय कोकणवरील आब्रुनुकसानीची केस सेशन्स कोर्टानं केली रद्द*

_रत्नागिरी (प्रतिनिधी) : खेड शहरातील एका आंदोलनाची बातमी केली म्हणून माय कोकण विरोधात माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी टाकलेला आब्रुनुकसानीचा खटला मुंबईच्या सेशन्स कोर्टानं रद्द केला आहे. या दाव्याच्या सुनावणी दरम्यान बातमी देणं हे पत्रकाराचं काम आहे हा युक्तीवाद दिंडोशी सेशन्स कोर्टानं मान्य करत माय कोकणला मोठा दिलासा दिला आहे.३० नोव्हेंबर २०१८ रोजी तत्कालीन आमदार संजय कदम यांनी खेड शहरामध्ये मिरवणूक काढून आंदोलन केलं होतं. इतर वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रांप्रमाणे माय कोकणनंही या आंदोलनाची बातमी आपल्या ऑनलाईन चॅनलवर दाखवली होती. या विरोधात माजी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी मुंबई बोरिवली कोर्टात डिफमेशनची (आब्रुनुकसानीचा दावा) केस दाखल केली होती. ही केस अन्यायकारक असल्यानं शमशाद खान यांनी माय कोकणतर्फे हायकोर्टात धाव घेतली. त्याठिकाणी बोरिवली कोर्टाची केस रद्द करावी अशी मागणी करण्यात आली. हायकोर्टामध्ये काही काळ ही केस चालली, पण अखेर सेशन्स कोर्टामध्ये रिव्हिजन पिटीशन दाखल करण्याची लिबर्टी घेवून माय कोकणनं हायकोर्टातून माघार घेतली. त्यानंतर काही दिवसातच मुंबईच्या दिंडोशी सेशन्स कोर्टात रिव्हिजन पिटीशन दाखल केली गेली.पत्रकाराला संविधानातील कलम १९ नुसार अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, समाजामध्ये जी घटना घडते आहे त्याची बातमी करण्याचा वृत्तसंस्थेला अधिकार आहे, त्याचबरोबर जे आंदोलन संजय कदम यांनी केलं होतं, त्याच्याशी माय कोकणचा कोणताही संबंध नव्हता, त्याचबरोरब बोरिवली येथील ट्रायल कोर्टानं घटना आणि कादयेशीर गोष्टींचा योग्य विचार न करता चुकीच्या पद्धतीनं माय कोकण विरोधात ऑर्डर दिली. असे मुद्दे माय कोकणचे वकील ॲड. प्रतिक करांडे आणि ॲड. सलमान खान यांनी दिंडोशी कोर्टात अत्यंत प्रभावीपणे मांडले. कोर्टानं हे सर्व मुद्दे ग्राह्य धरून माय कोकणच्या बाजूनं निकाल दिला आहे. माजी मंत्री रामदास कदम यांनी दाखल केलेली केस रद्द करत कोर्टानं हे मान्य केलं की, माय कोकण चॅनलने कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती आपल्या बातमीत दिलेली नाही. पत्रकारिता करण्याची आपलं कर्तव्य त्यांनी पार पाडलं आहे. दोन्ही बाजू ऐकून आमच्या असं लक्षात आलं आहे की, याठिकाणी आब्रुनुकसानी झालेली नाहीये, त्यामुळे आम्ही माय कोकण विरोधातील केस रद्द करून निकाली काढत आहोत. रामदास कदम यांच्याकडून ॲड. डॉ. निलेश पावसकर आणि शैलेश कंटारिया यांनी काम पहिलं. *हा तर सत्याचा विजय आहे – मुश्ताक खान*खरी बातमीदारी करणं आमचं काम आहे. आमच्यावर टाकण्यात आलेली केस ही अन्यायकारक होती. त्यामुळेच आम्ही वरच्या कोर्टात दाद मागितली. आमचं सगळं म्हणणं ग्राह्य धरत दिंडोशी सेशन्स कोर्टानं आम्हाला दिलासा दिला आहे. आमच्या विरोधातली केस रद्द करण्यात आली आहे. यामुळे आज मी अत्यंत समाधानी आहे. आम्ही कोणा व्यक्तीच्या विरोधात नाही. आम्ही पत्रकारितेचा वसा घेतला आहे, तो अविरतपणे करण्याचा आमचा मानस आहे. आमचे वकिल ॲड. प्रतिक करांडे आणि ॲड सलमान खान यांचे मी आभार मानतो. त्याचबरोरब रत्नागिरीतील पत्रकारांचाही मी आभारी आहे कारण ते अतिशय भक्कमपणे आमच्या पाठिशी उभे राहिले.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button