
स्वप्नालीचा पती सुकांत सावंतसह तीन संशयित आरोपींच्या पोलिस कोठडीत आणखी तीन दिवसांची वाढ
रत्नागिरी : तालुक्याच्या माजी पंचायत समिती सभापती स्वप्नाली सावंत यांचा खून केल्याप्रकरणातील पतीसह तीन संशयितांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. यात न्यायालयाने सोमवारी आणखी 3 दिवसांची वाढ केली.
पती सुकांत सावंत (वय 47, रा. सडामिर्या चौसोपीवाडी, रत्नागिरी), रुपेश उर्फ छोटा भाई कमलाकर सावंत (वय 43, रा. सडामिर्या मधलावठार, रत्नागिरी) आणि प्रमोद उर्फ पम्या बाळू गावणंग (वय 33, मूळ राहणार विसापूर कारुळ-गुहागर, सध्या राहणार मिर्याबंदर, रत्नागिरी) अशी तिघांची नावे आहेत. या गुन्ह्यात अजून काही आरोपी आहेत का? ते पाहणे गरजेचे आहे. पती सुकांत सावंत याने या गुन्ह्यात आपल्याला मदत करण्यासाठी गावणंगला पैशांचे आमिष दाखवल्याने याच्या तपासासाठी वाढीव कोठडीची मागणी करण्यात आली.
सोमवारी न्यायालयात हजर केल्यानंतर संशयित आरोपींतर्फे अॅड. फाजल डिंगणकर यांनी या संशयितांच्या पोलिस कोठडीत वाढ करण्यात येऊ नये, अशी मागणी केली. पोलिसांनी 9 दिवसात स्वप्नालीची हाडे, राख, वाहने, संशयितांचे मोबाईल आदी पुरावे गोळा केलेले आहेत. त्याचे नमूने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. तसेच 11 तारखेला सुकांतला अटक करण्यापूर्वी 5 ते 7 सप्टेंबरपर्यंत पोलिस सातत्याने चौकशीसाठी पोलिस ठाण्यात बोलावत होते. त्यामुळे पोलिस कोठडीत वाढ करू नये, अशी मागणी अॅड. डिंगणकर यांनी केली.
सरकारी वकिलांनी खून झालेल्या स्वप्नालीचा मूळ मोबाईल अजूनही पोलिसांना मिळालेला नाही, असे सांगितले. स्वप्नालीचे सिम ज्या मोबाईलमध्ये टाकून तिचे लांजा येथील लोकेशन दाखवण्यात आले तो मोबाईलही अजून हस्तगत करण्यात आलेला नसल्याचे न्यायालयात सांगितले.