*राजापूरच्या सभेत उद्धव ठाकरे यांनी केले आमदार राजन साळवी यांचे कौतुक तर चौकशी अधिकारी चव्हाण यांची घेतली हजेरी*
_____राजनची पाठ थोपटायला मी इथं आलोय. असे सांगत उद्धवजी ठाकरे यांनी आमदार राजन साळवी यांचे कौतुक केले संकटाच्या काळात आपलं कोण आणि परकं कोण हे कळतं. राजन साळवीच्या घरी धाड टाकली. इथं घरातील प्रत्येक वस्तूची किंमत लावली. त्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची किंमत लावता? ५ हजार रुपये. चौकशी अधिकारी सुशांत चव्हाण तुमची किंमत लावा, माझ्या महाराजांच्या मूर्तीची किंमत ५ हजार करता, साळवी यांच्या घरात असलेल्या बाळासाहेबांच्या आसनाची किंमत दहा हजार रुपये लावता? तुम्हाला त्याचे महत्त्व काय कळणार तुम्हाला शरम वाटत नाही. कोणत्या कुळात जन्मला, कोण आहेत तुमचे पूर्वज?, कोणाची चाकरी करताय? असा कर्मरीत सवाल ही ठाकरे यांनी चव्हाण यांना विचारला या नतद्रष्ट माणसांची ओळखली पाहिजे. तुमच्या सात पिढ्या जन्मल्या तरी महाराजांची किंमत करू शकत नाही. तुमच्यात हिंमत असेल तर राजन साळवीला आतमध्ये टाका. तुमच्या घरातील आई वडिलांची किंमत कुणी केली तर चालेल का? छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत, बाळासाहेब ठाकरे हे वडील आहेत. मिंद्यांच्या वडिलांची किंमत नाही म्हणून ते माझे वडील चोरतायेत. त्यांना माझ्या वडिलांची किंमत कळाली पण चव्हाण तुम्हाला कळाली नाही असा घणाघात ठाकरेंनी राजन साळवींची चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर केला. राजन साळवी मिंदेकडे आणि भाजपात गेले नाही म्हणून त्रास दिला जातोय. कितीही काही केले तरी हा मावळा झुकणार नाही. दिवस बदलत असतात. आज दुर्दैवाने त्यांचे दिवस आहेत. परंतु जर त्यांचे दिवस फिरले तर तुमचेही दिवस फिरतील हे अधिकाऱ्यांनी लक्षात ठेवावे. ही नोंद आम्ही घेतलीय. उद्या त्यांचे दिवस फिरल्यावर तुमचे दिवस आणखी वाकडे होतील. सरकार येते आणि सरकार जाते. आजपर्यंत देशात अनेक पंतप्रधान झाले. राज्यात अनेक मुख्यमंत्री झाले. पण कुणीही सत्तेचा अमरपट्टा घेऊन येत नाही. ना कुणी आयुष्याचा अमरपट्टा घेऊन येते. सत्ता येते आणि जाते. पण लांडग्यासारखी तुम्ही कुणाची लाचारी करणार असाल तर तुमची लांडगेगिरी काय आहे ही सरळ केल्याशिवाय राहणार नाही असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं. www.konkantoday.com