४५ पशुपालकांना ११ लाखांची मदत
लम्पी आजाराची जिल्ह्यातील अनेक गुरांना लागण झाल्याने येथील पशुपालकांवर मोठे संकट ओढवले. या आजारात अनेक गुरे दगावली. जिल्हा परिषद स्तरावरून केलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे तातडीने लसीकरणही करण्यात आले. गेल्या वर्षभरात या आजारामुळे जिल्ह्यात २२५ गुरे दगावली. त्यापैकी आतापर्यंत १०३ पशुपालकांना नुकसान भरपाईचे प्रस्ताव मंजुरी देण्यात येवून ४५ जणांना ११ लाख २९ हजाराची नुकसान भरपाई वितरीत करण्यात आली आहे.
लम्पी आजाराचा विळखा जिल्ह्याच्या उत्तर भागात मोठ्या प्रमाणावर बसला होता. गुरांना या आजाराची लागण झाल्यामुळे पशुपालकही हताश झाले होते. त्यामुळे जिल्हा परिषद स्तरावर पशु संवर्धन विभागामार्फत तातडीने लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली. जिल्ह्यात या आजारामुळे एकूण २ हजार ९०७ गुरांना बाधा झाली होती. राबवलेल्या लसीकरणामुळे या आजारातून २ हजार ६४९ गुरे बरी झाली. जिल्ह्यात लसीकरणाची मोहीम प्रभाविपणे राबविण्यात येवून सुमारे सव्वादो लाख गुरांचे लसीकरण करण्यात आले. हे लसीकरणाचे काम १०० टक्के पूर्णत्वास गेल्याचे जि.प. पशूसंवर्धन विभागामार्फत सांगण्यात आले आहे. www.konkantoday.com