रत्नागिरीतील बहुतांश डॉक्टर फाटक हायस्कूलचे माजी विद्यार्थी; मराठी माध्यमातून शिकूनही यशाला गवसणी,पाच भावी डॉक्टरांचा सन्मान


रत्नागिरी : प्रतिनिधी
रत्नागिरीतील बहुतांश डॉक्टरांचे शालेय शिक्षण हे फाटक हायस्कूलमध्ये झाले, ही अभिमानाची बाब आहे. मराठी माध्यमाच्या शाळेत शिकूनही डॉक्टर, इंजिनिअर, आर्किटेक्ट, सीए होता येते, हे येथील विद्यार्थ्यांनी सिद्ध केले आहे. डॉक्टर होण्याची परंपरा फाटक हायस्कूलने जपली आहे, असा सूर फाटक हायस्कूलमध्ये भावी डॉक्टरांच्या सत्कार समारंभावेळी उमटला.
रत्नागिरीतील फाटक हायस्कूलच्या शताब्दी वर्षाच्या सांगता समारंभानिमित्त दि न्यू एज्युकेशन संस्थेमार्फत विविध कार्यक्रम सुरू आहेत. त्या अंतर्गत नीट परीक्षा 2023 मधून सध्या शासकीय एमबीबीएस महाविद्यालयात शिकत असलेले फाटक हायस्कूलचे माजी विद्यार्थी मृदुला बनगर, आदित्य पाटील, वेदांत भट, सोहिनी जोगळेकर, रुपेश देवळेकर यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला संस्थेच्या कार्याध्यक्षा अ‍ॅड. सुमिता भावे, उपाध्यक्ष अ‍ॅड. विनय आंबुलकर, सदस्य प्रसाद वाघधरे, मुख्याध्यापक राजन कीर, उपमुख्याध्यापक भास्कर झोरे, पर्यवेक्षक विश्वेश जोशी, सचिव दिलीप भातडे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक करताना मुख्याध्यापक राजन कीर म्हणाले, फाटक गुरुजींनी लावलेल्या शिक्षणरूपी रोपट्याचा आज वटवृक्ष झालेला पहायला मिळतोय. गेल्या 100 वर्षांमध्ये शाळेने अनेक विद्यार्थी घडवले. रत्नागिरी शहरातील बहुतांश डॉक्टर हे फाटक हायस्कूलचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांचे यश पाहून आम्हाला अभिमान वाटतो, असे कीर म्हणाले.
सत्कारानंतर विद्यार्थिनी मृदुला बनगर मनोगतात म्हणाली, सर्व सत्कारांपेक्षा शाळेतील सत्कार मनाला भावला. आम्ही मराठी माध्यमातून शिकलो याचा कमीपणा आम्हाला कधीही वाटला नाही. मराठी माध्यमातून शिकल्याने काही समस्या आल्या, असेही कधी झाले नाही. मराठी शाळेबाबतचा गैरसमज पालकांनी वेळीच दूर करायला हवा, असे आवाहन मृदुलाने हिने केले. आम्हाला मिळालेले यश एकाएकी मिळाले नाही, तर यात फाटक हायस्कूलचा वाटा मोलाचा आहे, असे मत विद्यार्थी आदित्य पाटील याने व्यक्त केले.
संस्थेच्या कार्याध्यक्षा अ‍ॅड. सुमिता भावे म्हणाल्या, आज भावी डॉक्टरांचा सन्मान करताना अभिमान वाटतो. स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी मुंबई, पुणे येथे जावे लागू नये, यासाठी संस्थेने विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाची संधी उपलब्ध करून दिली. विद्यार्थी मोठमोठ्या अभ्यासक्रमांना जावेत, अशी एक संस्था पदाधिकारी म्हणून माझी अपेक्षा होती. विद्यार्थ्यांच्या पंखांत बळ आणण्याच्या दृष्टीने जे-जे आवश्यक होते त्या-त्या उपाययोजना आम्ही केल्याचे अ‍ॅड. भावे म्हणाल्या.
संस्थेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. विनय आंबुलकर म्हणाले, रत्नागिरीसारख्या शहरात शाळांची व शिक्षणाची स्पर्धा वाढत आहे. या स्पर्धेत फाटक हायस्कूलने गुणवत्ता जपल्याचा अभिमान वाटतो. आता आपल्या सर्वांची जबाबदारी वाढली आहे. संस्थेने पुढील 25 वर्षांचे नियोजन केले आहे. पालकांनीही मराठी माध्यमाच्या शाळांबद्दल दृष्टिकोन बदलायला हवा.
पर्यवेक्षक विश्वेश जोशी म्हणाले, पालकांनी आमच्यावर विश्वास ठेवून मुलांना या शाळेत पाठवले. त्या हिर्‍यांना पैलू पाडण्याचे काम आमच्याकडून झाले, याचा शिक्षक म्हणून अभिमान वाटतो. शाळेत विविध स्पर्धा राबवल्या जातात, त्यात विद्यार्थी यश मिळवतात. त्यांच्या यशाने आम्हालाही बळ मिळते.
सचिव दिलीप भातडे म्हणाले की , मराठी माध्यमात शिकूनही डॉक्टर होता येते, हे फाटक हायस्कूलच्या अनेक विद्यार्थ्यांनी दाखवून दिले आहे. पालकांनी मनातील संभ्रम दूर करायला हवा. दरवर्षी अनेक मुले विविध क्षेत्रात चमकत आहेत. त्यांनी सिद्ध करून दाखवले आहे की सेमी इंग्रजी असूनही आम्ही कुठेही कमी पडत नाही. या मुलांच्या पालकांनीही आमच्यावर विश्वास ठेवला आहे. आमच्या संस्थेच्या विविध शाळांमध्ये प्रवेश घ्यावा, असे आवाहनही भातडे यांनी केले. फाटक हायस्कूलमध्ये चांगल्या शैक्षणिक सुविधा आहेत. विविध स्पर्धांमधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव दिला जातो. भविष्याचा पाया येथेच भक्कम केला जातो , असे मत पालक अनंत देवळेकर यांनी व्यक्त केले. असे विद्यार्थी घडवत असताना शिक्षक कुठेही कमी पडत नाहीत. त्यामुळे शिक्षकांना धन्यवाद आणि सोयी – सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या देणाऱ्या संस्थेलाही धन्यवाद, असे देवळेकर म्हणाले .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश देवरूखकर यांनी केले. यावेळी विद्यार्थी व पालक उपस्थित होते. कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button