
रत्नागिरी ग्राहक पंचायतीच्या पत्राची पोलिसांकडून दखल
रत्नागिरी : रत्नागिरीतील वाहतुकीच्या गैरसोयीबाबत रत्नागिरी ग्राहक पंचायतीतर्फे देण्यात आलेल्या पत्राची जिल्हा वाहतूक पोलिसांनी दखल घेतली. पालिका आणि संबंधित कंत्राटदाराला योग्य त्या कार्यवाहीच्या सूचना केल्या.रत्नागिरी शहरातील रस्त्यांच्या मजबुतीकरणामुळे नागरिकांच्या होत असलेल्या गैरसोयीबाबत महाराष्ट्र ग्राहक पंचायतीच्या रत्नागिरी जिल्हा शाखेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते. शहरात काँक्रिटीकरण सुरू असताना नागरिकांना, वाहनचालकांना, पादचार्यांना खूपच मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्याकडे प्रशासनाने सोयीस्कर दुर्लक्ष केल्याच्या तक्रारी ग्राहक पंचायतीकडे आल्या आहेत. वाहतुकीचे कोणतेही नियोजन करण्यात आलेले नाही. रत्नागिरी पालिका आणि पोलिसांच्या वाहतूक शाखेने याकडे लक्ष द्यायला हवे होते. पण त्याबाबतीत साफ दुर्लक्ष झाले आहे. कॉंक्रिटीकरण वेगवेगळ्या टप्प्यात होत आहे. हे काम जेथे जोडले आहे तेथे खड्डे आहेत. त्यावरून वाहतूक सुरू आहे. दुचाकी वाहनांना त्याची कोणतीच सूचना मिळत नसल्यामुळे वेगाने आलेली वाहने त्या खड्ड्यात आदळत आहेत. त्यामुळे छोटे मोठे अपघात अनेक ठिकाणी होत आहेत. अनेक ठिकाणी वाहतूक वळविल्याच्या ठिकाणी रस्त्यावर खडी पसरली आहे. ही खडी दुचाकीचालकांना फारच त्रासदायक ठरत आहे, अशा आशयाच्या या पत्राच्या प्रती जिल्हा वाहतूक पोलीस आणि रत्नागिरी नगरपालिकेलाही देण्यात आल्या होत्या.या पत्राची दखल घेऊन जिल्हा वाहतूक शाखेचे निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी ग्राहक पंचायतीच्या प्रतिनिधींना आपल्या कार्यालयात बोलावून घेतले. त्यानुसार ग्राहक पंचायतीचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष संदेश सावंत, सहसचिव श्रीमती श्रेया साळवी, सहसंघटक उमेश आंबर्डेकर, सदस्य दिलीप कांबळे कार्यालयात उपस्थित राहिले. त्याचबरोबर आवश्यक उपाययोजना करण्याच्या दृष्टिकोनातून कंत्राटदार विनय जांगले आणि नगरपालिकेचे अभियंता आनंद थोरात यांनाही बोलाविण्यात आले होते. तेथे झालेल्य चर्चेनंतर सर्व समस्यांबाबत करावयाच्या उपाययोजना, सिग्नलची कामे, रस्त्यावरचे पट्टे, जाहिरात फलक काढून घेणे, तयार बोर्ड, बॅरिकेटस् लावणे, रस्त्यावर पडलेली खडी बाजूला करण्याबाबत कंत्राटदारांना सूचना करण्यात आल्या. रस्त्याचे काम सुरू झाल्यापासून कंत्राटदारांना वेळोवेळी वाहतूक पोलीस जिल्हा शाखेतर्फे प्रत्यक्ष बोलावून सूचना करण्यात आल्या होत्या, असेही यावेळी सांगण्यात आले. वाहतूक पोलीस शाखा वाहतुकीच नियमन करत आहे, असेही पोलिसांतर्फे स्पष्ट करण्यात आले.यावेळी वाहतूक पोलीस निरीक्षक श्री. मेंगडे यांना ग्राहकतीर्थ बिंदुमाधव जोशी यांची प्रतिमा भेटीदाखल देण्यात आली.