कोकणातील उत्पादनांसाठी कंटेनर वाहतूक सुरू करण्याचा निर्णय कोकण रेल्वे प्रशासनाने घेतला
मालवाहतुकीला प्राधान्य देताना कोकणातील उत्पादनांसाठी कंटेनर वाहतूक सुरू करण्याचा निर्णय कोकण रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. खेड स्थानकातून ही वाहतूक केली जाणार असून, त्यासाठी आवश्यक सुविधा उभारणीला गती देण्यात आली आहे.त्यासाठी खेड येथील उद्योजक, कोकण रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी, काँनकॉर, कस्टम विभाग आणि महाप्रित यांचा एक व्यापारी मेळावा मंगळवारी मुंबईत बीकेसी येथे झाला.
खेड रेल्वे स्थानकातून सुरू होणाऱ्या कंटेनर वाहतुकीसाठी वेगाने पावले उचलली जात आहेत. त्यासाठी या अंतर्गत येणाऱ्या विविध विभागांना एकच छताखाली आणण्याचा आणि त्यांच्या प्रश्नांना उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न या व्यापारी मेळाव्यातून करण्यात आला.
काँनकॉरचे चेअरमन संजय स्वरूप यांनी काँनकॉरने रत्नागिरी आणि खेडमध्ये व्यापार वृद्धीसाठी केलेले प्रयत्न आणि खेडमधून होऊ घातलेल्या कंटेनर वाहतुकीचे फायदे सांगितले. कोकण रेल्वेचे संचालक संतोष कुमार झा यांनी व्यापार वृद्धीसाठी खेड आणि रत्नागिरी येथे उभारल्या जात सुविधांची तसेच मुलभूत सुविधांची माहिती दिली. यात गोदाम, शीतगृह अशा विविध सुविधांचा समावेश आहे.
काँनकॉरच्या कमल जैन यांनी खेडमध्ये उद्योजकांना काँनकॉरकडून दिल्या जाणाऱ्या विविध सुविधांची माहिती दिली.जेएनपीटी सीमाशुल्क उपायुक्त रामदास काळे यांनी व्यापाराशी संबंधित सीमाशुल्क विभागाचे नियम आणि बदलत्या काळातील व्यापार यावर महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.या व्यापारी मेळाव्यात खेड चिपळूण येथून आलेल्या उद्योजकांनी अनेक शंका – प्रश्न उपस्थित केल्या. त्यांचे शंका निरसन कोकण रेल्वे, काँनकॉर आणि सीमाशुल्क विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून करण्यात आले. फेब्रुवारीच्या मध्यापासून कंटेनर वाहतूक सुरू करण्याच्या दृष्टीने या मेळाव्यात सकारात्मक चर्चा करण्यात आली. त्याला सर्वांनीच सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
www.konkantoday.com