- रत्नागिरी : अयोध्या फार पूर्वीपासून असून प्रभू श्री रामाच्या पदस्पर्शाने अयोध्यानगरी पावन झाली. अयोध्या व प्रभू रामाचा उल्लेख इतिहास साहित्य, काव्यरचना, ऐतिहासिक, परकीय अभ्यासकांनी त्यांच्या त्यांच्या काळात केला आहे. अथर्ववेद, तैत्तरीय आरण्यक, महाभारत वनपर्व, सभापर्व, स्कंद पुराण, लोमश रामायण यामध्येही अयोध्येचा उल्लेख आहे. अनेक ऐतिहासिक संदर्भसुद्धा आहेत. प्रभू रामाचे हे संदर्भ खूप काही सांगून जाते आणि भारतीय व जगभरातील लोकांच्या मनावर प्रभू रामाचे अधिराज्य आहे, असे प्रतिपादन पुणे येथील भारतीय विद्या विषयाचे अभ्यासक, संशोधक श्री. आशुतोष बापट यांनी केले.गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात (स्वायत्त) ६७ व्या वर्षी कालिदास स्मृती व्याख्यानमालेत त्यांनी अयोध्येचे रामायण या विषयावर व्याख्यान दिले. राधाबाई शेट्ये सभागृहात कार्यक्रम झाला.श्री. बापट म्हणाले की, काही विचारवंत राम व रामायण काल्पनिक असल्याचे सांगितात. परंतु सर्वोच्च न्यायालयात जो निकाल लागला त्यामध्ये अयोध्या व रामायण या विषयक अनेक पुरावे दिल्यामुळे राम मंदिर पुन्हा उभारण्यात आले. राम नाही, या विचाराला त्या वेळच्या लोकांनी विरोध केला नाही, याचे आश्चर्य वाटते. पुराण संदर्भानुसार अयोध्या म्हणजे भगवान विष्णूचे मस्तक मानले जाते. शिलालेख, नाणी यांचे पुरावे खरे मानले जातात. परंतु विचारवंतांनी ३ खोटे शिलालेखही सादर केले होते, परंतु ते खोटे असल्याचे सिद्ध झाले.श्री. बापट म्हणाले की, हिंदूंप्रमाणे जैन, बौद्ध धर्मियांसाठी अयोध्या महत्त्वाची आहे. जैन रामायण सुद्धा सांगितले जाते व बौद्ध धर्मीय सुद्धा त्यांच्या परंपरा सांगतात. नाणी, शिलालेख, ताम्रपट यांच्यात प्रभू रामाचा उल्लेख झाला. पट्टकल येथे सातव्या शतकात बांधलेल्या विरूपाक्ष मंदिरात राम-लक्ष्मण, सीतेच्या मूर्ती कोरल्या आहेत. वेरूळच्या कैलास लेण्यांमध्ये रामायण पट कोरला आहे.अयोध्येतील साधू महंतांचे आखाडे, तिथल्या लढाया, हिंदूंची एकी, शिखांनी केलेल्या लढाया आदींचे ऐतिहासिक संदर्भ श्री. बापट यांनी सांगितले. अतिशय ओघवत्या शैलीत त्यांचे भाषण खूपच रंजक ठरले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि पाहुण्यांचा परिचय संस्कृत विभागप्रमुख डॉ. कल्पना आठल्ये यांनी करून दिला.प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी श्री. बापट यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. याप्रसंगी प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी उपस्थित होते. प्रा. स्नेहा शिवलकर यांनी सूत्रसंचालन केले. रत्नागिरीतील अनेक संस्कृतप्रेमी, निवृत्त शिक्षक, विद्वान या कार्यक्रमात उपस्थित होते.www.konkantoday.com
Back to top button