
११ ते १५ फेब्रुवारी ‘महासंस्कृती महोत्सव’ मोठ्या उत्साहात साजरा करु– पालकमंत्री उदय सामंत
रत्नागिरी, दि. २५ : येथील प्रमोद महाजन क्रीडा संकुलात ११ ते १५ फेब्रुवारी दरम्यान होणारा महासंस्कृती महोत्सव सर्वांनी मिळून मोठ्या उत्साहात साजरा करु या, असे आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.*
३५० व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त सलग ५ दिवस महासंस्कृती महोत्सव साजरा करण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज बैठक झाली. या बैठकीला अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे, कार्यकारी अभियंता अमोल ओटवणेकर, मुख्याधिकारी तुषार बाबर, प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर, शिक्षणाधिकारी (माध्य.) सुवर्णा सावंत, बिपीन बंदरकर, अभिजीत गोडबोले, राजन शेट्ये, विजय खेडेकर आदी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री.सामंत म्हणाले, मराठी बाणा, लोककला, शिवबा, महाराष्ट्राची लोकधारा आणि अवधूत गुप्ते यांचा कार्यक्रम असे या ५ दिवसांचे नियोजन आहे. महिला बचत गटांचे या ठिकाणी फूड स्टॉल लावावेत. या महोत्सवाची प्रसिध्दी सर्वत्र करावी.
शिक्षण विभागाने प्रत्येक तालुक्यात चित्रकला स्पर्धा घ्यावी. शिवाय, ५ ते ११ फेब्रुवारी दरम्यान खुल्या गटासाठी निबंध स्पर्धा आयोजित करावी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित सचित्र दालन उभे करावे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने माहितीचा स्टॉल उभा करावा. त्याशिवाय शिवकालीन मर्दानी खेळांचे प्रदर्शनही करावे. ज्येष्ठ साहित्यिक, कलाकार यांना निमंत्रित करावे, असे ते म्हणाले.
www.konkantoday.com