मुंबई लुटणाऱ्यांना जेलमध्ये टाकणार घोटाळ्याचा पैसा मोजायला बसवणार,- आदित्य ठाकरे
महाराष्ट्रात आमचे सरकार येणारच आहे. आमचे सरकार आल्यानंतर मुंबईत प्रशासकाच्या माध्यमातून ज्यांनी घोटाळे केले, मुंबई ज्यांनी लुटली त्या प्रत्येकाला जेलमध्ये टाकणार आणि जेलमध्ये बसून घोटाळ्याचा पैसा मोजायला लावणार, असे सांगतानाच मिंधेंनी मुंबईत जो घोटाळा केला आहे तो पै न पै आम्ही परत एकदा मुंबई महापालिकेच्या तिजोरीत आणणार, असा शब्द शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज दिला.
आदित्य ठाकरे मैदानात उतरले आहेत. ‘महा निष्ठा, महा न्याय, महाराष्ट्र…’ असा नारा देत त्यांनी झंझावात सुरू केला आहे. आज प्रभादेवीत दै. ‘सामना’ कार्यालयासमोर शिवसैनिकांचा दणदणीत आणि खणखणीत मेळावा झाला. विभाग क्रमांक 10च्या वतीने हा मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्याला तुफान गर्दी झाली होती. या गर्दीच्या साक्षीने आदित्य ठाकरे यांनी मिंधे आणि भाजपवर तोफ डागली. खोके सरकारला महाराष्ट्र लुटू देणार नाही, असे ठणकावून सांगत त्यांनी हल्ला चढवला. हा लढा मी केवळ शिवसेनेसाठी नाही तर महाराष्ट्रासाठी, तरुणांसाठी आणि लोकशाही वाचवण्यासाठी लढणार असल्याचे ते म्हणाले. यासाठी मला तुमच्या आशीर्वादरूपी पाठिंब्याची गरज लागणार आहे. हे आशीर्वाद आपण देणार का, असे आवाहन करताच हजारोंच्या जनसमुदायाने दोन्ही हात उंचावून आपण तुमच्यासोबत असल्याचा विश्वास दिला.
www.konkantoday.com