महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा सुटणार? आज होणार बैठक
इंडिया’ आघाडीतून पश्चिम बंगालमधून तृणमूल काँग्रेस आणि पंजाबमधून आपने बाहेर पडून लोकसभा निवडणूक स्वतंत्र लढविण्याची घोषणा केल्याच्या पार्श्वभूमीवर आज (ता.२५) राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांची जागा वाटपावर मुंबईत बैठक होणार आहे
.या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपांवर चर्चा होणार असून अद्यापही आघाडीमध्ये १५ जागांवर एकमत होऊ शकलेले नसल्याने त्यावर एकत्रित बसून मार्ग काढला जाणार आहे. तसेच जागा वाटपाचा फॉर्म्युलाही निश्चित केला जाणार आहे. पश्चिम बंगाल आणि पंजाबमध्ये काँग्रेसचे स्थानिक पक्षांसोबत सूर जुळले नसले तरी राज्यात मात्र महाविकास आघाडीमध्ये तुर्तास सूर बिनसलेले नाहीत. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ सुरु असल्याने ‘इंडिया’ आघाडीच्या जागा वाटपाची चर्चा पुढे जात नव्हती, आता मात्र आघाडीच्या जागा वाटप चर्चेला वेग येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, या बैठकीला शिवसेनेचे (ठाकरे गट) खा. संजय राऊत यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनाही निमंत्रित केले असल्याची माहिती माध्यमांसोबत बोलताना दिली. मात्र, वंचित बहुजन आघाडीला अद्याप काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षांच्या नेत्यांची स्वाक्षरी असलेले कुठलेही पत्र अथवा निमंत्रण प्राप्त झालेले नाही. त्यामुळे उद्याच्या बैठकीला ‘बिन बुलाए मेहमान’ बनून आम्ही जाणार नाही, अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीने जाहीर केली आहे.
www.konkantoday.com