
येवा!कोकण आपलाच असा सिंधुदुर्गातील बहुचर्चित चिपी विमानतळावरून गणेशचतुर्थीपूर्वी विमान प्रवास सुरु होणार
सिंधुदुर्गातील बहुचर्चित चिपी विमानतळाची वाहतूक सुरु करण्यासाठी नवा मुहूर्त मिळाला आहे. येत्या गणेशचतुर्थीपूर्वी चिपी विमानतळावरुन विमान प्रवास सुरु होईल, अशी माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे. नुकतंच विनायक राऊतांनी आमदार दिपक केसरकर यांच्यासोबत चिपी विमानतळाची पाहणी केली आहे. यावेळी पत्रकार परिषद घेत त्यांनी याबाबतची माहिती दिली.सिंधुदुर्गातील बहुचर्चित चिपी विमानतळावरून गणेशचतुर्थीपूर्वी विमान प्रवास सुरु होणार आहे.काही महिन्यांपूर्वी डीजीसीए आणि एअरपोर्ट अथॉरिटीने ज्या दुरुस्त्या सुचवल्या होत्या, त्याचे तंतोतंत पालन करुन आता एअरपोर्ट वाहतुकीसाठी सज्ज झाला आहे. यासाठी जवळपास तीनशे ते साडेतीनशे कर्मचारी तसेच पंजाबवरुन मशिनरी आणि बाहेरून इतर टेक्नॉलजी मागवली होती. त्यांनी रनवेच्या पुर्नबांधणीचं काम व्यवस्थित केलं आहे. त्याचा रिपोर्ट आयआरबी कंपनीने डीजीसीएकडे पाठवला आहे, असे विनायक राऊत म्हणाले.यानंतर आता डीजीसीएने पाहणी करुन या विमानतळाला लायसन्स दिलं की कोणत्याही क्षणी विमान वाहतूक सुरु होईल. विमान कंपनीचे अधिकारी इथे येऊन थांबलेले आहेत. त्यांचे तिकीट काऊंटर देखील तयार आहे. त्यामुळे लायसन्स मिळाल्यानंतर आठ दिवसात हा एअरपोर्ट पुन्हा सुरु होईल, अशी माहिती विनायक राऊत यांनी पत्रकार परिषदेवेळी दिली
चिपी विमानतळावर कालपासून ट्रायल लँडींग सुरु झाली आहे. त्यामुळे आता लवकरच नियमित सेवा सुरु होईल. येत्या काही दिवसातच डीजीसीएची टीम येईल. त्यानंतर 1 मार्चपासून नियमितपणे सिंधुदुर्ग ते मुंबई आणि अहमदाबाद ते सिंधुदुर्ग अशी विमान वाहतूक सुरु होईल, असे विनायक राऊत म्हणाले होते. त्यानतंर आता विनायक राऊतांनी येत्या गणेशचतुर्थीपूर्वी चिपी विमानतळावरुन विमान प्रवास सुरु होईल, अशी माहिती दिली आहे. मात्र अद्याप याची कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
www.konkantoday.com
