पालघरच्या समुद्र किनारी ‘अफगाणी’ चरसची पाकिटे ? ८० लाख रुपयांचा चरस विक्री करताना मच्छीमार ठाणे पोलिसांच्या जाळ्यात


मुंबईमध्ये चरस विक्री करण्यासाठी आलेल्या एका मच्छिमाराकडून ८० लाख रुपयांचे चरस ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने जप्त केले. अभय पागधरे (४३) असे मच्छिमाराचे नाव असून त्याला ही चरसची पाकिटे पालघरमधील एका सुमद्र किनारी मिळाली आहेत.
हे चरस काही प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये गुंडाळण्यात आले होते. तसेच त्यावर ‘अफगाण प्रोडक्ट’ असा उल्लेख आहे. त्यामुळे ही पाकिटे अफगाणिस्तान येथून आल्याचा संशय पोलिसांना आहे. काही महिन्यांपूर्वी अशाचपद्धतीने कोकणच्या समुद्र किनारी चरसची पाकिटे मिळाली होती. पुन्हा एकदा हा प्रकार घडल्याने समुद्र किनारी चरस वाहून येत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

पालघरमधून एकजण अमली पदार्थ विक्रीसाठी मुंबईत जाणार असल्याची माहिती ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे, साहाय्यक पोलीस आयुक्त निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके, साहाय्यक पोलीस निरीक्षक पल्लवी ढगे-पाटील, भूषण शिंदे, उपनिरीक्षक सुनील अहिरे, हवालदार अजय साबळे, सुशांत पालांडे, माधव वाघचौरे, पोलीस नाईक उत्तम शेळके, पोलीस शिपाई यश यादव यांच्या पथकाने घोडबंदर येथील माजिवडा नाका भागात सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे पोलिसांना ८ किलो ८२ ग्रॅम वजनाचे ८० लाख ८२ हजार रुपये किमतीचे चरस आढळून आले. त्याची चौकशी केली असता तो डहाणू भागातील मच्छिमार असल्याचे समोर आले. त्याला येथील समुद्र किनारी चरसची पाकिटे मिळाल्याची माहिती त्याने पोलिसांना सांगितली. जप्त करण्यात आलेले चरस हे प्लास्टिकच्या पाकिटांमध्ये गुंडाळण्यात आले होते. या पाकिटांवर ‘अफगाण प्रोडक्ट’ असा उल्लेख आहे अशी माहिती उपायुक्त शिवराज पाटील यांनी दिली. हे चरस नेमके समुद्र किनारी कसे आले याचा पोलीस शोध घेत आहेत.

काही महिन्यांपूर्वी कोकणातील समुद्र किनारीदेखील अशाच पद्धतीची चरसची पाकिटे आढळून आली होती. या पाकिटांवरदेखील अफगाण प्रोडक्ट असा उल्लेख होता. आता पालघरच्या समुद्र किनारी चरस या अमली पदार्थाची पाकिटे आढळली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button