
राज्यात आतापर्यंत 57 लाख कुणबी नोंदी सापडल्या
राज्यात आतापर्यंत 57 लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत. त्यापैकी 37 लाख 94 हजार कुणबी दाखल्यांचे वितरण करण्यात आले आहे. मराठवाड्यात 32 हजार नोंदी सापडल्या असून त्यांचे दाखले देण्याची प्रक्रियाही सुरू आहे, अशी माहिती शिवसेनेचे (शिंदे गट) मुख्य प्रवक्ते तथा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मंगळवारी येथे दिली.त्यांनी यावेळी मनोज जरांगे-पाटील यांना मुंबईतील आंदोलन मागे घ्यावे असे आवाहन करतानाच म्हटले की, ज्यांच्या कुणबी नोंदी सापडणार आहेत, त्यांना फेब्रुवारीमध्ये स्वतंत्रपणे मराठा आरक्षण देण्यात येणार आहे.
दीपक केसरकर म्हणाले की, मोडी लिपीचे मराठीत भाषांतर करण्यासाठी सॉफ्टवेअर तयार करण्यात येणार असून पुढील काळात वेगाने कुणबी दाखले दिले जातील. राज्यात ज्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत, त्यांचे डिजिटायजेशन करण्याची प्रक्रिया सरकारने सुरू केली आहे. मराठवाड्यात आतापर्यंत 24 हजार दाखले दिले आहेत. एक दाखला मिळाला की, रक्ताच्या नात्यातील 30 ते 40 जणांना दाखले मिळतात. त्यानुसार मराठवाड्यातही अंदाजे 10 लाख लोकांना दाखले मिळू शकतात, असे केसरकर म्हणाले.
www.konkantoday.com