
राज्यातील बहुचर्चित तलाठी भरती परीक्षेची अंतिम निवड यादी जाहीर
राज्यातील बहुचर्चित तलाठी भरती परीक्षेची अंतिम निवड यादी जाहीर करण्यात आली आहे. भूमी अभिलेख विभागाकडून मंगळवारी (२३ जानेवारी) रात्री उशिरा ही यादी जाहीर करण्यात आली आहे.परीक्षेची गुणवत्ता यादी याआधीच जाहीर करण्यात आली होती. आता अंतिम निवड यादी देखील जाहीर करण्यात आली आहे.राज्यात तलाठी पदाच्या चार हजार ४६६ रिक्त जागांसाठी जाहिरात निघाली होती. यासाठी राज्यभरातून दहा लाख ४१ हजार ७१३ परीक्षार्थीनी अर्ज दाखल केले होते. तलाठी परीक्षा १७ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर २०२३ या कालावधीत तीन टप्प्यात घेण्यात आली होती.
उमेदवारांना प्रश्न किंवा उत्तरसूचीबाबत काही आक्षेप तसेच हरकती असल्यास त्या नोंदविण्यासाठी २८ सप्टेंबर ते आठ ऑक्टोबरदरम्यान मुदत देण्यात आली होती. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या ९ हजारांहून अधिक आक्षेप टीसीएस कंपनीकडून योग्य ठरविण्यात त्यानुसार सामान्यीकरण पद्धतीने परीक्षेमध्ये ४८ उमेदवारांना २०० पेक्षा जास्त सामान्यीकृत गुण मिळाल्याचे दिसून आले. दरम्यान, परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसह राजकीय संघटनांनी केले होते.
मात्र, हे आरोप, दावे फेटाळत भूमी अभिलेख विभागाने गुणवत्ता यादीनंतर यशस्वी उमेदवारांची यादी तयार करण्याचे काम सुरू केले आहे. त्यानुसार मंगळवारी रात्री उशिरा अंतिम यादी जाहीर करण्यात आली. ही यादी भूमी अभिलेख विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
www.konkantoday.com