
आंतरराज्य टोळीतील अट्टल चोरट्याचा आकस्मित मृत्यू
सोने-चांदीचे दागिने पॉलिश करण्याच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्या ५ जणांच्या टोळीला पोलिसांनी नाशिक येथून सोमवारी अटक केली होती. दरम्यान, या टोळीतील एकाचा (दि.२३) उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले असता संशयास्पद मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहंमद सुबेर इम्रान शेख (वय २८, तुळशीपूर जमुनिया, जि. भागलपूर, बिहार) असे मृत्यू झालेल्या आरोपीचे नाव आहे. खेड शहरात दि. ८ जानेवारी रोजी दुपारी १२.१५ वाजण्याच्या सुमारास एका महिलेला सोने-चांदीचे दागिने पॉलिश करण्याचे सांगून बेशुद्ध केले होते. आणि हात चलाखी करून लाखो रुपयांचे दागिने चोरून नेले होते. या घटनेत ४ लाख ८० हजार रुपये इतक्या किमतीच्या ४ सोन्याच्या बांगडया व २ सोन्याच्या पाटल्या घेऊन ते पळून गेले होते. खेड पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक नितीन भोयर याचा तपास करत होते. त्यांच्या पथकाने नाशिकमधील मनमाड येथून सोमवारी ही टोळी ताब्यात घेतली.
या टोळीने महाराष्ट्रातील ८ जिल्ह्यात एकूण २१ महिलांची अशा प्रकारे फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामध्ये नाशिक, पुणे, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, अहमदनगर, जालना व संभाजीनगर या जिल्ह्यांचा समावेश आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांमध्ये मोहंमद सुबेर इम्रान शेख (वय २८), साजिद लाडू साह (वय २४), मोहंमद आबिद इल्यास शेख (वय २९), महमद जुबेर फती आलंम शेख (वय ३२, सर्व रा. तुळसिपुर जमुनिया, जि. भागलपुर, राज्य बिहार) तसेच नंदकुमार श्रीरंग माने (वय ५० रा. मनमाड शिवाजी चौक ता. नांदगाव, जि. नाशिक) यांचा समावेश आहे.
www.konkantoday.com