
पाथर्डी ते उमरोली रस्त्यावरील चिखलात घसरताहेत वाहने
चिपळूण : तालुक्यातील पाथर्डी ते उमरोली या रस्त्याची पावसामुळे दयनीय अवस्था झाली आहे. अगोदरच रस्त्यावर खड्डे आणि ते बुजविण्यासाठी जांभा दगडाचा भराव टाकल्याने संपूर्ण रस्ता लालेलाल झाला आहे. यावरून वाहने घसरण्याचे प्रकार सुरू असून हा रस्ता धोकादायक बनला आहे.हा रस्ता नेहमीचा वर्दळीचा आहे. उमरोली मराठी शाळा याच रस्त्यावर आहे. या रस्त्यावरून शाळेची मुले चालत जातात. त्यांनाही या चिखलमय रस्त्याचा त्रास होतो. कधी कधी चालताना मुलांच्या चपला चिखलात रुतून बसतात. दुचाकीस्वारांना तर हा रस्ता मृत्यूचा सापळा ठरला आहे. हा रस्ता डांबरीकरणाचा आहे मात्र, सध्याची स्थिती पाहून लाल
कार्पेट पसरल्यासारखा लालेलाल झालेला दिसून येत आहे. रस्त्यावर भले मोठे खड्डे पडल्याने ते बुजविण्यासाठी खाणीतील जांभा दगडाचा भराव टाकण्यात आला. मात्र, पावसाच्या पाण्याने चिखल होऊन संपूर्ण रस्ताच धोकादायक बनला
आहे. वाहनचालक, शाळेची मुले यांना या रस्त्याचा मोठा त्रास होत आहे. या रस्त्यावर ग्रीट किंवा जाडी खडी आणून टाकावी, व रस्ता सुरळीत करावा, अशी मागणी वाहनचालक व प्रवाशांनी केली आहे.