
गणपतीपुळे समुद्रात बुडताना साताऱ्याच्या चौघांना वाचवले
गणपतीपुळे येथील समुद्रात सातारा जिल्ह्यातील चार जणांना बुडताना समुद्रकिनाऱ्यावरील मोरया वॉटर स्पोर्टच्या बोटचालकांनी वाचवले. ही घटना रविवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास घडली.
गणेश सुतार (वय 35), शमाली सूर्यवंशी (वय 38), मृदुला सूर्यवंशी (वय 18) व मंदी सूर्यवंशी (वय 14) अशी बुडणाऱ्या चौघांची नावे आहेत. हे सर्वजण सातारा नांदवडे तालुका कोरेगाव येथील रहिवासी आहेत. हे चौघेजण पोहण्यासाठी अति उत्साहात समुद्राच्या खोल पाण्यात उतरले. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने गटांगळ्या खाऊ लागले. बुडताना हात उंचावून वाचवण्यासाठी मदत मागत होते. याचवेळी समुद्राकिनाऱ्यावर असलेल्या बोट चालकांच्या लक्षात आले. यावेळी क्षणाचाही विलंब न लावता बोट चालकांनी आपली बोट खोल समुद्रात नेऊन आपली धाडसी कामगिरी करत त्या चार जणांना वाचवले.
यावेळी गणपतीपुळे समुद्र किनाऱ्यावर असलेले गणपतीपुळे ग्रामपंचायतीचे जीवरक्षक अक्षय माने व गणपतीपुळे देवस्थानचे सुरक्षारक्षक पवार यांनी ही पर्यटकांना वाचविण्यासाठी जेसकी बोट चालकांना मोलाची मदत केली. यातील गणपतीपुळे ग्रामपंचायतीचे जीवरक्षक अक्षय माने व गणपतीपुळे देवस्थानचे सुरक्षारक्षक श्री. पवार यांनी खोल समुद्राच्या पाण्यात गेलेल्या त्या चार जणांना खोलवर पाण्यात जाऊ नका, असा इशारा दिला होता मात्र त्याकडे दुर्लक्ष करत आपला अतिरेक व बेजबाबदारपणे खोल समुद्रात गेले. या घटनेची माहिती मिळताच गणपतीपुळे पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस कर्मचारी सागर गिरी गोसावी व अमेय शिवगण यांनी तत्काळ समुद्रकिनारी भेट देऊन बुडणाऱ्या पर्यटकांविषयी माहिती घेतली.