एसीबी कार्यालयाच्या बाहेर सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा


उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते आमदार राजन साळवी आणि त्यांचे मोठे बंधु दीपक साळवी हे दोघेजण आज दुपारी साडेबारा वाजता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या रत्नागिरी कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाले.विभागाच्या रत्नागिरी कार्यालयाबाहेर प्रचंड गर्दी करत सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या. भगवे झेंडे आणि आमदार राजन साळवी यांच्या समर्थनाचे बॅनर घेऊन शिवसैनिकांनी एल्गार केला.

काही दिवसांपूर्वीच शिवसेना उपनेते आमदार राजन साळवी यांच्या घरावर आणि हॉटेलवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकांनी धाडी टाकल्या होत्या. त्यानंतर आमदार राजन साळवी, त्यांची पत्नी अनुजा साळवी आणि मुलगा शुभम साळवी यांच्यावर रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्याच्या दुसऱ्या दिवशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पुन्हा आमदार राजन साळवी यांना समन्स बजावले.

सोमवार 22 जानेवारी रोजी मोठे बंधू दीपक साळवी यांच्यासह लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या रत्नागिरी कार्यालयात चौकशी साठी हजर राहण्यास सांगितले होते. आमदार राजन साळवी आज बारा वाजता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात जाणार हे कळताच जिल्हाभरातील शिवसैनिकांनी खासदार विनायक राऊत यांच्या संपर्क कार्यालयात गर्दी केली. तिथून साडेबारा वाजता मोठ्या संख्येने जमलेले शिवसैनिक जोरदार घोषणा देत नाचणे रोड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयावर धडकले. शिवसेना झिंदाबाद, राजन साळवी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है अशा घोषणा देत मिंधे सरकार हाय हाय अशा सरकारच्या विरोधातही घोषणाबाजी केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर पोलीस फाटा तैनात ठेवण्यात आला होता.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button