अखेर इंदवटीतील वर्गखोल्यांसाठी २० लाखांचा निधी मंजूर
एकीकडे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, त्यात डिजिटल शाळेचा गवगवा तर दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या शाळेची इमारत जीर्ण झाल्याने विद्यार्थ्यांना गुरांच्या गोठ्याचा आधार घ्यावा लागत आहे.
हे विदारक चित्र लांजा तालुक्यात असलेल्या इंदवटी येथील जिल्हा परिषद शाळेचं. या विषयाकडे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी (अजित पवार) गटाचे तालुकाध्यक्ष अभिजित राजेशिर्के यांनी लक्ष वेधले होते. अखेर प्रशासनाने त्याची दखल घेतल्याने इंदवटी शाळेला दोन वर्ग खोल्यांना तातडीने २० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
तालुक्यातील इंदवटी शाळा क्र. २ ही गेल्या तीन वर्षापासून गुरांच्या गोठ्यात भरत आहे. ग्रामस्थांकडून सातत्याने तालुका तसेच जिल्हास्तरावरील प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करून देखील त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत होते. या शाळेला राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजि पवार) गटाचे तालुकाध्यक्ष अभिजित राजेशिर्के यांनी भेट देवून ही बाब राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रदेश चिटणीस अजित यशवंतराव यांच्या निदर्शनास आणून दिली होती.
यशवंतराव आणि अभिजित राजेशिर्के यांनी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी पुजार यांची भेट घेतली. त्यांच्या झालेल्या भेटीत यशवंतराव आणि राजेशिर्के यांनी इंदवटी शाळा क्र. २ ची परिस्थिती व्हिडिओ आणि फोटोद्वारे मुख्याधिकारी यांच्यासमोर मांडली. www.konkantoday.com