अयोध्या नगरी सजली; उद्या होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी शहरात उत्साहाचे वातावरण


अयोध्या : राम मंदिरातील प्राण प्रतिष्ठेसाठी अवघे दोन दिवस शिल्लक असताना संपूर्ण अयोध्यानगरी रामरंगात रंगली आहे. प्राण प्रतिष्ठेसाठी देशभरातून विविध नद्यांचे पाणी, कन्नौजमध्ये खास तयार केलेले अत्तर आले आहे. तसेच निमंत्रितांच्या आगमनाला सुरुवात झाली आहे. अयोध्येमध्ये तयारीवर अखेरचा हात फिरवला जात आहे. श्री रामाच्या मूर्तीसाठी खास पोषाख तयार झाला आहे.
शनिवारी श्रीरामाच्या मूर्तीला स्नान घालण्यासह विशेष विधी करण्यात आले तसेच देशभरातून विविध तीर्थक्षेत्रांहून आणलेल्या पवित्र जलाने गाभाऱ्याचे शुद्धीकरण करण्यात आले. प्राण प्रतिष्ठेसाठी देशभरातून विविध १४ जोडप्यांची म्हणून निवड करण्यात आली आहे.

मंदिरालाही फुलांची सजावट व रोषणाई केली जात आहे. मंदिर, त्याचा परिसर, तसेच प्रवेशद्वार सजवण्यासाठी मोठया प्रमाणात उत्तम दर्जाच्या फुलांचा तसेच विशेष दिव्यांचा वापर केला जात आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली. अयोध्येमध्ये ठिकठिकाणी श्रीरामाच्या प्रतिमा दिसत आहेत. चित्रकार विविध चित्रे काढत आहेत, रांगोळया सजत आहेत.

प्राण प्रतिष्ठेसाठी खास तयार करवून घेतलेल्या वस्तूंबरोबरच भाविकांनी देशभरातून पाठवलेल्या वस्तूही अयोध्येत दाखल झाल्या आहेत. त्यामध्ये महाकाय घंटा, विशाल कुलुप, १२७६ किलो वजनाचा लाडू अशा वेगवेगळया वस्तूंचा समावेश आहे.

शहरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. सोमवारी त्यामध्ये अधिक वाढ होण्याची अपेक्षा आहे.

घोषणा आणि श्लोक

शहराच्या कानाकोपऱ्यात लावण्यात आलेल्या मोठमोठया होर्डिग्जवर ‘शुभ घडी आयी’, ‘तैयार है अयोध्या धाम, विराजेंगे श्री राम’ ‘राम फिर लौटेंगे’ अशा घोषणा रंगवण्यात आल्या आहेत. अयोध्या में राम राज्य आणि ‘श्री अयोध्या धाम के कणकण मे चंदन है, आपका अयोध्या धाम में शत शत वंदन है’ या घोषवाक्यांसह राम मार्ग, सरयू नदी किनारा आणि लता मंगेशकर चौक अशा प्रमुख ठिकाणी पोस्टरवर रामायणातील विविध श्लोकही छापण्यात आले आहेत.

मोदींचे तमिळनाडूत मंदिर दर्शन

प्राण प्रतिष्ठा सोहळयापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरातील महत्त्वाच्या मंदिरांमध्ये दर्शन घेत आहेत. शनिवारी त्यांनी तमिळनाडूमधील दोन प्राचीन मंदिरांमध्ये प्रार्थना केली. तिरुचिरापल्ली जिल्ह्यातील श्रीरंगम मंदिर आणि रामनाथपुरम जिल्ह्यातील रामनाथस्वामी मठामध्ये त्यांनी प्रार्थना केली. श्रीरंगम मंदिरात त्यांनी कम्ब रामायण ऐकले. येथे त्यांच्याकडे अयोध्येतील राम मंदिराला भेट म्हणून वस्त्रम देण्यात आले. तसेच मोदींनी रामेश्वरमच्या अंगीतीर्थ किनाऱ्यावर समुद्रात स्नान केले.

देश-विदेशातून भेटवस्तूंचा वर्षांव

विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष आलोक कुमार यांनी काश्मीर, तमिळनाडू आणि अफगाणिस्तानातून पाठवण्यात आलेल्या भेटवस्तू श्री राम मंदिराचे ‘यजमान’ अनिल मिश्रा यांच्याकडे शनिवारी सुपूर्द केल्या. भेटवस्तू देणारे वेगवेगळया धर्माचे असले तरी त्यांनी राम मंदिराच्या उभारणीबद्दल आनंद व्यक्त केला, असे आलोक कुमार यांनी काश्मीरमधून केशर दान करणाऱ्यांबद्दल म्हटले आहे. राम मंदिर रेखाटलेले रेशमी बेडशीटबद्दल तमिळनाडूतील रेशीम उत्पादकांनी पाठवली आहे. ती तयार करण्यासाठी १० दिवस लागले. अभिषेकासाठी आलेले अफगाणिस्तानच्या कुभा नदीचे पाणीही यजमानांना देण्यात आले.

सायबर गुन्ह्यांपासून सतर्कतेचा इशारा

प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमापूर्वी अयोध्येत सायबर गुन्हे वाढत असून नागरिकांनी सतर्क राहावे, असा इशारा अयोध्या पोलिसांनी शनिवारी इशारा दिला आहे. शहरात होणारा प्राण प्रतिष्ठा सोहळा पाहता सायबर गुन्हेगार लोकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत आहेत. सर्वसामान्यांना मोफत प्रसाद वाटप करण्यासाठी राम मंदिराच्या नावावर बनावट क्यूआर कोड पाठवून देणगी गोळा करून फसवणूक करत असल्याचे पोलिसांनी सांगितले. राम मंदिराला भेट देण्यासाठी व्हीआयपी पास आणि प्रवेश पास देणे, राम मंदिर, अयोध्या या नावाने बनावट वेबसाइट तयार करणे, असे प्रकार उघडकीस आले असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे नागरिकांनी सत्यता पडताळणी केल्याशिवाय कोणत्याही अज्ञात व्यक्तीने पाठवलेल्या कोणत्याही निनावी विनंतीला किंवा व्हॉट्सअ‍ॅप संदेशाला प्रतिसाद देऊ नये, तसेच कोणालाही पैसे देऊ नयेत, अशी विनंती पोलिसांनी केली आहे.

‘राम की रसोई’ ते लंगर

अयोध्येत येणाऱ्या भाविकांना मोफत आणि गरम भोजन मिळावे यासाठी शहरात ठिकठिकाणी सामुदायिक स्वयंपाकघरे सुरू करण्यात आली आहेत. त्यामध्ये ‘राम की रसोई’पासून लंगपर्यंत अनेक धर्मादाय व सेवाभावी भोजन व्यवस्थांचा समावेश आहे. येथे येणारे भाविक शरयू नदीत स्नान केल्यानंतर अक्षरश: प्रत्येक गल्लीबोळात सुरू असलेल्या या भोजन व्यवस्थांचा लाभ घेत आहेत. खिचडी, बटाटयाची भाजी व पुरी, कढी-भात, पापड, लोणचे असा साधा आणि सर्वांना आवडणारा सात्विक आहार येथे दिला जात आहे.

अयोध्या रामरंगी रंगली

  • अयोध्येत जागोजागी राम मंदिर रेखाटलेले झेंडे, धनुष्यधारी रामाचे कट आऊट, छायाचित्र, फलक यांमुळे संपूर्ण अयोध्या राममय झाल्याचे दिसत आहे.
  • मंदिराकडे जाणाऱ्या पुनर्विकसित रस्त्याला रामजन्मभूमी पथ असे नाव देण्यात आले आहे. येथील एका इमारतीतील सार्वजनिक बँकेच्या नवीन शाखेला ‘रामजन्मभूमी’ शाखा असे नाव देण्यात आले आहे.
  • व्हिजिटिंग कार्डस, फलक आणि कॅलेंडरही भव्य मंदिराच्या प्रतिमांनी सजले आहेत.
  • शहरात फलक लावणाऱ्या प्रत्येक कंपनीने कोणत्या ना कोणत्या प्रकारे राम मंदिराचे चित्रण केले आहे. सार्वजनिक वाहतूक सेवाही राममय झाल्याचे दिसून येते. संपूर्ण अयोध्येतील बस, रस्ते आणि अगदी मोबाइल फोन कॉलर टय़ूनमध्ये यांचा ्रभाव आहे.
    सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम बीएसएनएलने रामजन्मभूमी मार्गाशेजारी एका भिंतीजवळ मंदिराची प्रतिमा, छायाचित्रांनी जवळजवळ सर्व दुकानांच्या फलकांवर तसेच हॉटेल आणि लॉजच्या लॉबीच्या जागा पटकावली आहे.
    www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button