खासगी शिकवण्यांची दुकानदारी आणि मनमानी कारभारावर अंकुश ठेवण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाची शिकवण्यांसाठी नवी नियमावली


केंद्र शासनाने इयत्ता दहावीच्या खालील (किंवा १६ वर्षांखालील) विद्यार्थ्यांना ‘कोचिंग सेंटर’मध्ये प्रवेश देण्यास मनाई केली आहे. विद्यार्थी आत्महत्या, स्पर्धापरीक्षा आणि प्रवेश परीक्षांच्या तयारीच्या नावाखाली वाढलेली खासगी शिकवण्यांची दुकानदारी आणि मनमानी कारभारावर अंकुश ठेवण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने शिकवण्यांसाठी नियमावली जाहीर केली आहे.
स्पर्धा परीक्षा आणि प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी राजस्थानमधील कोटासह देशभरातील अनेक शहरे खासगी शिकवण्यांसाठी प्रसिद्धी पावत आहेत. विद्यार्थ्यांना उसंत न देता, काळ वेळ न पाहता परीक्षेसाठी घोकंपट्टीचा रेटा लावणाऱ्या शिकवण्यांच्या कारभारावर सातत्याने टीकाही होत असते. विद्यार्थ्यांच्या वाढत्या आत्महत्यांमुळे या शिकवण्यांचा कारभार गेल्या दोन वर्षांपासून अधिक चर्चेत असून त्याबाबत खासदारांनी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केले होते. या पार्श्वभूमीवर केंद्राने खासगी शिकवण्यांना नियमावलीच्या चौकटीत बांधण्याचा प्रयत्न केला आहे. या नियमावलीनुसार आता पहिलीपासून सुरू असलेले मोठे शिकवणी वर्ग बंद करावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिकवण्यांचा आवाका दहावीनंतर प्रवेश देता येणाऱ्या आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारीपुरत्याच राहण्याची शक्यता आहे.

पुढील तीन महिन्यांत नव्याने सुरू होणाऱ्या किंवा असलेल्या शिकवण्यांनी नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. नोंदणी, पडताळणी, कारवाई आणि एकूण नियमनाची जबाबदारी राज्य शासनांची असेल, असेही नियमावलीत स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच आपल्या शिकवणी केंद्रातील सुविधा, शुल्क, शिक्षकांची माहिती, त्यांची पात्रता, समुपदेशकांचे तपशील, अभ्यासक्रम, अभ्यासक्रमाचा कालावधी, वसतीगृह असल्यास त्याची माहिती, शुल्क आदी तपशील संकेतस्थळावर जाहीर करणे बंधनकारक असेल. सुट्टीच्या दिवशी कोणतीही परीक्षा घेण्यात येऊ नये, असेही नियमावलीत स्पष्ट करण्यात आले आहे.

प्रवेश रद्द झाल्यास शुल्क परत

एखाद्या विद्यार्थ्यांने प्रवेश घेतल्यानंतर काही कालावधीने प्रवेश रद्द केला, तर त्याला उर्वरित कालावधीचे शुल्क परत करण्यात यावे. त्याचबरोबर वसतीगृह, खाणावळ याचेही शुल्क परत करावे, अशी तरतूद करण्यात आली आहे.

‘कोचिंग सेंटर’ची व्याख्या

‘कोचिंग सेंटर’ किंवा शिकवणी संस्था कशाला म्हणावे, याची व्याख्याही नियमावलीत करण्यात आली आहे. त्यानुसार एका वर्गात पन्नास किंवा त्यापेक्षा अधिक विद्यार्थी शालेय, महाविद्यालयीन किंवा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाला पूरक, स्पर्धा परीक्षा किंवा प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी खासगी शिकवणी असेल, तर त्या संस्थांना कोचिंग सेंटर संबोधण्यात आले आहे. कला, खेळ किंवा तत्सम प्रशिक्षण वर्गासाठी ही नियमावली लागू नसेल. घरगुती स्वरूपात घेण्यात येणाऱ्या शिकवण्यांचाही नियमावलीत उल्लेख नाही. त्यामुळे दहावीच्या खालील विद्यार्थ्यांच्या घरगुती शिकवण्यांसाठी बंधने लागू होणार नाहीत.

नियमावलीमध्ये काय?

  • दहावी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या व १६ वर्षांवरील विद्यार्थ्यांनाच ‘कोचिंग सेंटर’मध्ये प्रवेश
  • किमान पदवी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचीच शिक्षक म्हणून नियुक्त
  • प्रत्येक ‘कोचिंग सेंटर’मध्ये समुपदेशाची नियुक्ती बंधनकारक
  • नियमांचे उल्लंघन केल्यास १ लाख रुपयांपर्यंत दंड किंवा नोंदणी रद्द करण्याची कारवाई
  • परीक्षेत अव्वल विद्यार्थी आपल्याच सेंटरमध्ये शिकल्याचे फलक लावण्यास मज्जाव
  • गुणवत्ता यादीत स्थानाचे आश्वासन देण्यास बंदी
  • तशा आशयाच्या जाहिराती थेट किंवा आडवळणाने करण्यास मनाई * आठवडयाची सुट्टी, तसेच सण, उत्सवांच्या कालावधीत सुट्टी देणे आवश्यक
    www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button