राज्याची शिवसेना पाठीशी त्यामुळे आपण कशालाही घाबरत नाही -आमदार राजन साळवी
कोणतीही चूक केलेली नाही. मी दोषी नाही त्यामुळेच मी निश्चिंत आहे. प्रत्येक गोष्टीला सामोरे जाण्याची हिंमत परमेश्वराने मला दिलेली आहे. त्यामुळे माझ्यावर गुन्हा दाखल करून मला अटक केली तरी मी घाबरत नाही, अशी स्पष्ट भूमिका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेते, आमदार राजन साळवी यांनी व्यक्त केली आहे.लाचलुचत प्रतिबंध विभागाने गुरुवारी सकाळी आमदार राजन साळवी यांच्यावर कारवाई करत त्यांच्या घराची व हॉटेलची झाडाझडती सुरु केली. त्यांच्यावर रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर आमदार साळवी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
लाचलुचपत प्रतिबंध विभागाची पहिली नोटीस आली तेव्हापासून मी चौकशीला सामोरे जात आहे. त्यांना जी माहिती पाहिजे ती प्रामाणिकपणे देण्याचा मी प्रयत्न केला आहे. मी काही दिवसांपूर्वी सांगून आलो होतो की, आता आलो ते शेवटचा आलो आहे. यापुढे तुमची नोटीस आली, निरोप आला तरी मी येणार नाही. त्याचदिवशी वाटले होते की, हो लोक माझ्यापर्यंत पोहचतील. दोन दिवसापासून ही मंडळी रत्नागिरीत आहेत.
ते पुढे म्हणाले की, सत्ता आहे त्यामुळे सत्तेच्या अनुषंगाने आम्हाला त्रास देणे सुरू आहे. मी निर्दोष आहे. मी काय आहे हे मला स्वत:ला माहिती आहे, कुटुंबाला, लोकांना आणि पक्षाला माहिती आहे. त्यामुळे मी कशालाही घाबरत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी जे पैसे सांगितले, दाखवले ते मला कुठले ते माहिती नाही. उलट आमच्यावर जे कर्ज आहे ते ही त्यांनी दाखवावे, असेही साळवी म्हणाले
हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मी लाडका सैनिक होतो. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा निष्ठावंत सैनिक आहे. माझ्या पक्षाचा माझ्यावर विश्वास आहे आणि माझा पक्षावर विश्वास आहे. त्यामुळे माझ्या पाठिशी जनता व पक्ष आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्याला फोन करून धीर दिला असून संपूर्ण राज्याची शिवसेना आपल्या पाठीशी असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे आपण कशालाही घाबरत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आ राजन साळवी यांच्यावरील कार्यवाई संपली
आ राजन साळवी यांच्या घरावर आज सकाळी छापा टाकण्यात आला. सुमारे दहा तास ही कारवाई सुरु होती. अखेर सायंकाळी ७ वाजता ही कारवाई संपली. अँटी करपशन चे अधिकारी काही कागदपत्र घेऊन आज परतले व आजची कारवाई पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले
www.konkantoday.com