‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ निमित्तकोकण भवनात पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन


 :- मराठी भाषा संवंर्धन पंधरवड्या निमित्त पुस्तक प्रदर्शनाचे  उद्घाटन  कोकण महसूल उप आयुक्त विवेक गायकवाड  यांच्या हस्ते आज करण्यात आले.
कोकण विभागाचे भाषा संचालनालय, विभागीय आयुक्त कार्यालय, विभागीय माहिती कार्यालय आणि बृहन्मुंबई राज्य कर्मचारी संघटना, कोकण भवन शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने  हा कार्यक्रम  करण्यात येत आहे.  
        यावेळी भाषा संचालक श्रीमती विजया डोनीकर, जीएसटी रायगड विभगाचे संयुक्त संचालक जितेंद्र पाटील, कोकण विभागीय सहाय्यक भाषा संचालक योगेश शेट्ये, सहाय्यक भाषा संचालक शरद यादव, कोकण भवनचे वैद्यकीय अधिकारी डॉ.गणेश धुमाळ, तहसिलदार माधुरी डोंगरे  अधिक्षक विजय हसुरकर,  तसेच कोकण भवनातील अधिकारी व कर्मचारी  मोठ्या संख्येने उपस्थित होते.
                   राजभाषा मराठीचा दैनंदिन व्यवहारात मोठया प्रमाणात व जास्तीत जास्त वापर व्हावा,  मराठी भाषेचे वैभव जपण्यासाठी व भाषेच्या संवर्धनासाठी राज्यभर 14 जानेवारी ते 28 जानेवारी हा कालावधी 'मराठी भाषा संवर्धन पंधरवडा' म्हणून साजरा करण्यात येत आहे. राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, राज्यातील केंद्र शासनाच्या अखत्यारीतील सर्व संस्थांना या कालावधीत विविध उपक्रम आणि कार्यक्रम राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याविषयी राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाने शासन निर्णय जाहीर केला आहे. ग्रंथप्रदर्शन, ग्रंथदिंडी आणि कथाकथन, माहितीपट व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, राज्यातील विविध महाविद्यालये, सामाजिक संस्थांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 
तसेच राज्यातील 36 जिल्ह्यांमध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवडा उत्साहात साजरा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मराठी संस्कृती मंडळ तथा राज्य मराठी विकास संस्था यांनी राज्यातील पुणे, औरंगाबाद, नागपूर, कोल्हापूर, मुंबई आणि कोकणातील रत्नागिरी याठिकाणी असलेल्या साहित्य संस्थांची मदत घेऊन हा पंधरवडा यशस्वी करण्याचे आयोजन करण्यात आले आहे.
 सोशल मीडियावर देखील ही चळवळ सुरू झाली आहे. हा पंधरवडा साजरा करताना समाज माध्यमे, वृत्तपत्रे आणि  वाहिन्यांव्दारे प्रसिध्दी करण्यात येणार असल्याचे या शासन निर्णयात सांगण्यात आले आहे.
        मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त कोकण भवनात मांडण्यात आलेले हे पुस्तक प्रदर्शन याच उपक्रमाचा भाग असून  हे प्रदर्शन दि. 28 जानेवारी 2024 पर्यंत राहणार आहे.  प्रदर्शनाची वेळ सकाळी 10.00 ते सायंकाळी 6.00 अशी असणार आहे. 
भाषा संचालनालयामार्फत प्रकाशीत करण्यात आलेल्या विविध प्रकाशनांचा समावेश या पुस्तक प्रदर्शनात करण्यात आला आहे. कोकण भवनात येणारे नागरीक आणि विशेषत: कोकण भवनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या पुस्तक प्रदर्शनास आवर्जून भेट द्यावी. असे आवाहन महाराष्ट्र राज्य भाषा संचालक श्रीमती विजया डोनीकर यांनी यावेळी केले आहे. 

www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button