
राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते पोर्टेबल इन्फ्लाटेबल एलईडी लाइटिंग सिस्टीम आणि रबरबोट व इतर साधन सामग्रीचे लोकार्पण
रत्नागिरी दि. 28: राज्याचे पर्यटन, पर्यावरण व वातावरणीय बदल, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत पोर्टेबल इन्फ्लाटेबल एलईडी लाइटिंग सिस्टीम आणि पूरपरिस्थितीत बचावकार्यासाठी आवश्यक असलेल्या रबरबोट व इतर साधन सामग्रीचा लोकार्पण सोहळा आज पेठमाप, चिपळूण येथे संपन्न झाले.
यावेळी कार्यक्रम स्थळी राज्याचे परिवहन संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. अनिल परब, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव, आमदार शेखर निकम, आमदार राजन साळवी, आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पर्यटन, पर्यावरण व वातावरणीय बदल, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी चिपळूण येथील वाशिष्ठी नदीतील गाळ काढणाऱ्या उपक्रमाची पाहणी केली.
रत्नागिरी जिल्ह्यातून वाहणाऱ्या नद्या, मर्यादेपेक्षा जास्त प्रमाणात होणारा पाऊस, पाण्याच्या विसर्गामुळे जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात दरवर्षी पूरस्थिती निर्माण होते. पावसाळ्यातील संभाव्य पूरस्थितीचा सामना करण्यासाठी तसेच आपत्कालीन परिस्थितीत शोध व बचावकार्य करण्यासाठी रबरी बोट व त्यानुषंगाने आवश्यक वस्तूंचा उपयोग होणार आहे.
तसेच आपत्ती काळात रात्रीच्या वेळी अडगळीच्या ठिकाणी जनरेटर अथवा मोठया बॅटऱ्या उपलब्ध न झाल्यने अडचणी निर्माण होतात. अशा वेळी Portable Infltable Emergency Lighting System चा वापर करुन घाट रस्ते, समुद्र किनारे अशा ठिकाणी शोध व बचाव कार्य करण्यास सुलभ होणार आहे.
यावेळी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी उपस्थित लोकप्रतिनिधीच्या समवेत पेठमाप ,चिपळूण, येथील वाशिष्ठी नदीच्या काठावर वृक्षरोपण केले.
