
‘महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना’नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेण्याचे आवाहन
नवी मुंबई, दि. 16 :- राज्यात दि. 01 डिसेंबर ,2023 ते 31 जानेवारी, 2024 आणि दि 01 फेब्रुवारी, 2024 ते 31 मार्च 2024 या कालावधीत दोन टप्प्यात “महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना 2023” राबविण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. अभय योजनेत दिनांक 1 जानेवारी 1980 ते 31 डिसेंबर 2020 या कालावधीत निष्पादित केलेले आणि नोंदणीस दाखल केलेल्या किंवा न केलेल्या दस्तावरील मुद्रांक शुल्क व त्यावरील दंडामध्ये सवलत देण्यात आलेली आहे. अशी माहिती कोकण विभाग ठाण्याचे नोंदणी उपमहानिरिक्षक व मुद्रांक उपनियंत्रक बाळासाहेब खांडेकर यांनी दिली आहे.
‘महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना-2023 ’ ही योजना मुद्रांक शुल्क आणि दंडाच्या रकमेवर आधारित कपात आणि माफीचे विविध स्तर प्रदान करते. या योजनेसाठी अर्जदार संबंधित मुद्रांक जिल्हाधिकारी किंवा उपनिबंधक यांच्या कार्यालयात वैयक्तिकरित्या किंवा ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्जाचा नमुना www.igrmaharashtra.gov.in वर उपलब्ध आहे. योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा निबंधक व मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. योजनेची माहिती विशेष कक्षात उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
ही योजना दोन टप्प्यात लागू करण्यात आली असून, पहिला टप्पा 1 डिसेंबर 2023 ते 31 जानेवारी 2024 आणि दुसरा टप्पा 1 फेब्रुवारी 2024 ते 31 मार्च 2024 या कालावधीत असणार आहे. या योजनेत 1 जानेवारी 1980 आणि 31 डिसेंबर 2020 दरम्यान अंमलात आणलेल्या साधनांचा समावेश आहे. संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये “महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना 2023” राबविण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. या योजनेत ग्रामीण व शहरी भागातील जनतेने जास्तीत जास्त प्रमाणात सहभाग घ्यावा असे आवाहन कोकण विभाग ठाण्याचे नोंदणी उपमहानिरिक्षक व मुद्रांक उपनियंत्रक बाळासाहेब खांडेकर यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.
www.konkantoday.com