कोकण, घाटमाथ्यावर आज अतिमुसळधार पावसाचा इशारा!

मुंबई :* मागील काही दिवस संपूर्ण राज्यात मुसळधार पाऊस कोसळल्यानंतर आता काही भागात पावसाचा जोर ओसरला आहे. कोकण तसेच घाटमाथ्यावर आज अतिमुसळधार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. दरम्यान, उर्वरित भागात पावसाचा जोर कमी राहणार आहे.गेल्या आठवड्यात नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी वाटचाल केल्यानंतर संपूर्ण राज्यात पावसाचा जोर वाढला होता. काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर पावसाचा जोर ओसरला आहे. आज कोकण आणि घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याचबरोबर विदर्भातही काही भागात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, कोकण आणि घाटमाथ्यावर पाऊस अधूनमधून कोसळत आहे. उर्वरित भागात मात्र पावसाने उघडीप दिली आहे. रायगड, रत्नागिरी, पुणे या भागात आज अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. तर मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग , सातारा आणि कोल्हापूर परिसरात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

*नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी देशाचा बहुतांश भाग व्यापला आहे. मोसमी वाऱ्यांनी शुक्रवारी (२० जून) मध्य प्रदेश, बिहार आणि उत्तर प्रदेश व्यापून, पश्चिम उत्तर प्रदेशचा आणखी काही भाग , उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशचा बहुतांश भाग आणि जम्मू काश्मीरच्या काही भागात प्रगती केली. त्यानंतर शनिवारी मोसमी वारे एकाच जागी होती.

*कोकण आणि मध्य महाराष्ट्रात यंदा मोसमी पावसाच्या सुरुवातीच्या टप्प्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. कोकणात १ ते २० जून या कालावधीत सरासरीच्या ३७ टक्के जास्त पाऊस झाला आहे. तर मध्य महाराष्ट्रात सरासरीच्या ३८ टक्के जास्त पाऊस झाला आहे.कोकणात २० जूनपर्यंत ५३४.३ मिमी, तर मध्य महाराष्ट्रात १२८.९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. साधारण या कालावधीत कोकणात ३९१ मिमी, तर मध्य महाराष्ट्रात ९३.३ मिमी पाऊस पडणे अपेक्षित असते. यंदा राज्यात मोसमी पाऊस लवकर दाखल झाला. त्यानंतर पावसाचा जोर प्रामुख्याने कोकणात सर्वाधिक होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button