
प्रसिद्ध शायर मुनव्वर राणा यांचं निधन
अमिताभ बच्चन यांनाही भुरळ घालणारे शतकातील महान शायर मुनव्वर राणा यांचं प्रदीर्घ आजाराने निधन झालं आहे. राणा गेल्या काही वर्षापासून आजारी होते. त्यांच्यावर अधूनमधून उपचार सुरू होते. त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना तातडीने एसजीपीजीआय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. लखनऊच्या एसजीपीजीआय रुग्णालयात त्यांनी आज अंतिम श्वास घेतला. ते 71 वर्षाचे होते. राणा यांच्या मुलाने त्यांच्या निधनाची पुष्टी केली आहे.
मुनव्वर राणा यांना दोन दिवस लखनऊच्या मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. किडनी फेल्युअर झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. आठवड्यातून तीन वेळा त्यांचा डायलिसीस करण्यात येत होतं.त्यांना क्रोनिक किडनीचा आजार होता. त्यामुळेच त्यांनी सार्वजनिक कार्यक्रमाला जाणंही बंद केलं होतं. काही दिवसांपूर्वी त्यांनी छातीत दुखू लागल्याची तक्रारही केली होती. त्यामुळे त्यांच्यावर उपचार करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना निमोनियाही झाला होता. त्यामुळे त्यांना श्वास घ्यायलाही त्रास होत होता. गेल्या काही दिवसांपासून त्यांना रुग्णालयात ऑक्सिजन सपोर्टवर ठेवलं होतं. आज अधिकच तब्येत खालावल्याने त्यांनी जगाचा निरोप घेतला.
राणा हे देशातील प्रसिद्ध शायरांपैकी एक होते. त्यांना साहित्य अकादमी पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं होतं. शाहदाबा या कवितेसाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला होता. त्याशिवाय त्यांना माटी रतन सन्मानानेही पुरस्कृत करण्यात आलं होतं. राणा यांना त्यांच्या आईवरील शायरीने सर्वाधिक प्रसिद्धी मिळवून दिली होती. देशातच नव्हे तर परदेशातही त्यांची लोकप्रियता होती. त्यांचा आवाजही दमदार होता. बॉलिवूड अभिनेते, महानायक अमिताभ बच्चनही त्यांच्या आवाजावर फिदा होते.
www.konkantoday.com