भजनातील गवळण गीत म्हणजे भगवंताच्या खोडकर लीलाना घातलेली भक्तिमय साद,सातव्या भजन कलावंत मार्गदर्शन मेळाव्यात बुवा प्रकाश वराडकर यांचे मार्गदर्शन
रत्नागिरी दि. १४ (प्रतिनिधी) : भजनातील पारंपरिक भक्ती गीतांमधील गवळण म्हणजे श्रीकृष्णासारख्या भगवंताच्या खेळकर आणि खोडकर बाल लीलाना संतांनी घातलेली भक्तिमय साद होय.अध्यात्माचा अर्थ शृंगाराच्या माध्यमातून सांगण्यासाठी कृष्णचरित्रातील लौकिक जीवन रूपकासाठी निवडले गेले आणि कृष्णाची लीला गवळणीतून मांडली गेली. निरुपणाच्या अंगाने विचार केला, तर ‘गवळण’ हे भगवंताचे ‘लीला संकीर्तन’ आहे. गवळणीत प्रणय आहे, क्रोध आहे, विलास आहे, विरह आहे, सुख आहे, वेदना आहे आणि शेवटी प्रेमभक्ती असा सप्तगुणांचा उत्कट आविष्कार आहे. अशा गवळण गितांमुळे भजनी कलेची रंगत अधिकाधिक वाढते आणि रसिक भक्तीरसात रंगून जातात, अशा भावना भजन कला मार्गदर्शक बुवा श्री. प्रकाश वराडकर यांनी व्यक्त केल्या.
रत्नागिरी येथील श्रीराम मंदिरात श्रीराम मंदिर ज्येष्ठ नागरिक कट्ट्याच्यावतीने शनिवार दिनांक 13 जानेवारी रोजी दुपारी ३ ते ५ वाजता या वेळात सातवा भजनी कलावंत मार्गदर्शन मेळावा उत्साही वातावरणात संपन्न झाला. या भजनी मेळाव्याचे अध्यक्षस्थान कट्ट्याचे मुख्य संयोजक श्री.अण्णा उर्फ सुरेश लिमये यांनी भूषविले तर सूत्रसंचालन सचिव श्री. सुरेंद्र घुडे यांनी केले. प्रसिद्धी प्रमुख श्री. प्रभाकर कासेकर यांनी उपस्थितांचे स्वागत करून गेल्या सात महिन्यात विना खंड संपन्न झालेल्या भजनी कलावंत मेळाव्यांना वाढता प्रतिसाद मिळत असल्याचे प्रतिपादन केले. पुढील मेळावा शनिवार दिनांक १० फेब्रुवारी रोजी दुपारी तीन ते पाच या वेळेत संपन्न होणार असून यावेळी बुवा श्री. प्रकाश वराडकर हे भजनातील अभंग या विषयावर शास्त्रोक्त मार्गदर्शन करणार आहेत.
यावेळी बुवा श्री. प्रकाश वराडकर यांनी भजनामधील पारंपारिक गवळण गितांबाबत शास्त्रोक्त मार्गदर्शन केले. ते म्हणाले, श्रीकृष्णाच्या लीला अनंत आहेत, अफाट आहेत. डोक्यावर दह्या-दुधाचे माठ घेऊन मथुरेच्या बाजाराला जाणाऱ्या गवळणी ‘दही घ्या, दूध घ्या’ असं म्हणायलाही विसरल्या आणि त्या कोणी गोविंदू घ्या, कोणी गोपाळ घ्या, दामोदरू घ्या’, असेच म्हणू लागल्या. गवळण गितांमधील हा गोडवा, हा करिश्मा गवळण गीताच्या सादरीकरणातून आजही तितक्याच उत्कटतेने अनुभवता येतो. आनंद हा नंद, सत्बुद्धी ही यशोदा, आत्मा हा कृष्ण, इंद्रिये ही गुरे, इंद्रियांचे धनी हे गोपाळ, ज्ञानवृत्ती या गवळणी, अनुराग ही मुरली, राधा ही मूर्तीमंत भक्ती, तर या सर्वांचे एकत्रिकरण झालेला देह हेच एक रम्य गोकुळ आहे. कृष्णालीलांबरोबरच हे भक्तिमय गोकुळ गवळण सादरीकरणातून साक्षात डोळ्यासमोर उभे राहते, असे ते म्हणाले.
या मेळाव्यात उपस्थित भजनी कलावंतानी सुरेल आवाजात गवळण गीते सादर करून मेळाव्याची रंगत वाढविली त्यामध्ये भजनी बुवा सर्वश्री सुरेंद्र घुडे, श्रीमती शुभांगी वारेकर, निवृत्त डेपो मॅनेजर श्री. दिलीपराव साळवी, आकाशवाणी कलावंत श्रीमती अनुया बाम, श्रीमती मंगला नलावडे काकी, श्री. रामचंद्र साटेलकर, श्रीमती अर्चना उतेकर, विश्वास शेंडे, श्री. रमाकांत पांचाळ, श्रीमती समीक्षा वालम, श्री. चंद्रकांत जोशी, श्री. शिवराम कदम, बाळाजी घोसाळकर यांचा समावेश होता. अण्णा लिमये यांनी भाव गीतातून भजनी कलावंतांना शुभेच्छा दिल्या.
भजन कला मार्गदर्शक बुवा प्रकाश वराडकर यांनी शेवटी गवळण गीत सादर केले. त्यानंतर वराडकर आणि घुडे यांनी गजर घेऊन मेळाव्याची सांगता केली. त्यांना हार्मोनियम साथ श्रीमती शुभांगी वारेकर यांनी दिली तर मृदुंग साथ आशिष पावसकर आणि रामचंद्र साटेलकर यांनी तसेच बुवा रमाकांत पांचाळ यांनी झांज साथ दिली. शेवटी आभार प्रदर्शनाने मेळाव्याची सांगता झाली.
www.konkantoday.com