काँग्रेसची ‘न्याय यात्रा’ आजपासून; ६७ दिवसांत १५ राज्यांमधील १०० लोकसभा मतदारसंघांतून प्रवास


राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’ला रविवारपासून हिंसाचारग्रस्त मणिपूरमधून सुरुवात होत आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधी बेरोजगारी, महागाई आणि सामाजिक न्याय हे मुद्दे यात्रेच्या माध्यमातून उपस्थित केले जाणार आहेत. यात्रा पूर्व ते पश्चिम दिशेने १५ राज्यांमधून जाईल आणि मुंबईमध्ये समाप्त होईल.
यात्रेची सुरुवात इम्फाळमधून न होता थौबल जिल्ह्यातून होईल. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि पक्षाचे वरिष्ठ नेते यावेळी उपस्थित असतील. यात्रा तब्बल ६,७१३ किलोमीटर अंतर पार करणार आहे. मात्र, ‘भारत जोडो यात्रे’प्रमाणे सर्व अंतर पायी न कापता, बराचसा प्रवास बसने केला जाईल, तसेच काही अंतर पायी चालले जाईल. सुमारे ६७ दिवसांच्या कालावधीत ११० जिल्हे, १०० लोकसभा मतदारसंघ आणि ३३७ विधानसभा मतदारसंघांमधून ही यात्रा जाईल. २० किंवा २१ मार्चला यात्रा मुंबईत यात्रेची समाप्ती होईल.

मणिपूरहून नागालँड, अरुणाचल प्रदेश, मेघालय, पश्चिम बंगाल, झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्र असा यात्रेचा प्रवासाचा मार्ग असेल. यात्रा उत्तर प्रदेशात सर्वाधिक ११ दिवस असेल. अमेठी, रायबरेली यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघांतून यात्रा जाईल.

ही यात्रा निवडणूक डोळय़ासमोर ठेवून काढत नसल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. मात्र, गेल्या वर्षांच्या अखेरीस झालेल्या विधानसभा निवडणुकीतील वाईट कामगिरीनंतर लोकसभा निवडणुकीची घोषणेची अपेक्षित वेळ साधून ही यात्रा काढली जात आहे. सरकार संसदेमध्ये लोकांचे प्रश्न उपस्थित करू देत नसल्यामुळे ‘भारत जोडो न्याय यात्रा’ काढत असल्याचे काँग्रेसने यापूर्वी सांगितले आहे. राज्यघटनेतील न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व ही तत्त्वे पुनस्र्थापित करणे हे या यात्रेचे उद्दिष्ट आहे. काँग्रेसने ‘इंडिया’च्या सर्व घटक पक्षांना यात्रेत सहभागी होण्याचे आमंत्रण दिले आहे.

मंदिर उदघाटन सोहळा आणि यात्रा

भाजपने आपले लक्ष अयोध्येमध्ये २२ जानेवारीला राम मंदिर उद्घाटनाचा सोहळय़ावर आयोजित केले आहे. लोकसभा निवडणुकीपर्यंत राम मंदिराचा मुद्दा चर्चेत ठेवण्याची भाजपची रणनीती आहे. अशा वातावरणात, आपण लोकांच्या जिव्हाळय़ाच्या प्रश्नावर यात्रा काढत असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button