चिपळुणात आता सांडपाण्याचे होणार शुद्धीकरण
नगर परिषदेने शहर स्वच्छतेसह नागरिकांच्या आरोग्याला अधिक महत्व दिले आहे. याचाच एक भाग म्हणून नजिकच्या काळात शहरातून येणारे सांडपाणी शुद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी शिवनदी व गोवळकोट कमानीजवळ नाल्याजवळ सांडपाणी प्रक्रिया केंद्र साकारण्यात येणार आहे. यासाठी ५४ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून तसा प्रस्ताव तांत्रिक मंजुरीसाठी शासनाकडे पाठवण्यात आला आहे.
मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांनी गेल्या काही वर्षापासून विविध उपक्रम राबवत शहर स्वच्छतेला अधिक महत्व दिले आहे. यासाठी त्यांना प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, अनंत मोरे, आरोग्य निरीक्षक महेश जाधव, आरोग्य विभागप्रमुख वैभव निकाते व सफाई कर्मचारी, अधिकारी यांचे सहकार्य लाभत आहे. स्वच्छतेचा विचार सुरू असतानाच शहरातील सांडपाणी थेट वाशिष्ठी नदीत सोडले असल्याचे त्यांच्या लक्षात आले. बहाद्दूरशेखनाका, मार्कंडी, पाग, मध्यवर्ती बसस्थानक, भोगाळे, भेंडीनाका अशा विविध भागातून गटारांना जोडून येणारे मोठे नाले शिवनदीच्या माध्यमातून वाशिष्ठी नदीला मिळतात. त्यामुळे नदीचे पाणी अधिकच दुषित होत असल्याचे लक्षात आले. हा गंभीर प्रकार थांबविण्यासाठी मुख्य ठिकाणी सांडपाणी प्रक्रिया केंद्र तयार करण्याची कल्पना पुढे आली. त्यानुसार मुख्याधिकारी शिंगटे यांनी आरोग्य निरीक्षक जाधव, आरोग्य विभागप्रमुख निवाते, नगर अभियंता प्रणोल खताळ आदींसह शहराची पाहणी केली. www.konkantoday.com